विदर्भवादी-महाराष्ट्रवाद्यांमध्ये हमरीतुमरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

नागपूर : "विभक्तीचा कल्पनाविलास' या दोन शब्दांमुळे उडालेली ठिणगी विदर्भवादी व संयुक्त महाराष्ट्रवाद्यांमध्ये वणवा पेटवून गेली. पत्रकार क्‍लब येथे आयोजित चर्चासत्रात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ऍड. श्रीहरी अणे यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने चर्चासत्राला आखाड्याचे स्वरूप आले. महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला हा अभूतपूर्व गोंधळ घडल्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये त्याची चर्चा राज्यभर पसरली. 

नागपूर : "विभक्तीचा कल्पनाविलास' या दोन शब्दांमुळे उडालेली ठिणगी विदर्भवादी व संयुक्त महाराष्ट्रवाद्यांमध्ये वणवा पेटवून गेली. पत्रकार क्‍लब येथे आयोजित चर्चासत्रात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ऍड. श्रीहरी अणे यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने चर्चासत्राला आखाड्याचे स्वरूप आले. महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला हा अभूतपूर्व गोंधळ घडल्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये त्याची चर्चा राज्यभर पसरली. 

ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन्‌ यांच्या "महाराष्ट्र मॅक्‍सिमस' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि त्यानिमित्ताने "वेगळा विदर्भ' या विषयावर चर्चासत्रही आयोजित केले होते. या वेळी खासदार अडसूळ, ऍड. अणे, माजी खासदार अविनाश पांडे, डॉ. वि. स. जोग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सुजाता आनंदन्‌ यांनी पुस्तकाविषयी भूमिका मांडल्यानंतर चर्चासत्र सुरू झाले. 

या पुस्तकातील "रोमॅंटिक नोशन्स ऑफ सेपरेशन' (विभक्तीचा कल्पनाविलास) असे शीर्षक असलेल्या व विदर्भाच्या मागणीवर आधारित असलेल्या एका लेखावरून चर्चा छेडण्यात आली. ऍड. अणे यांनी "विभक्‍तीचा कल्पनाविलास'वर मत व्यक्त करण्यापूर्वीच सभागृहात वेगळ्या विदर्भाचे समर्थन करणारे जास्त लोक असल्याचा दावा केला.

 "इथे उपस्थित लोकांना हात वर करायला सांगितले तर ते वेगळ्या विदर्भाचे समर्थन करतील. त्यामुळे विभक्‍तीचा कल्पनाविलास राहूच शकत नाही', असे त्यांनी म्हणताच विदर्भवाद्यांनी हात वर करून "जय विदर्भ'च्या घोषणा दिल्या. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनी "अखंड महाराष्ट्राचा विजय असो'च्या घोषणा दिल्या. अवघ्या काही सेकंदांत दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने आले. घोषणा देतानाच एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. काहींनी खुर्च्या उचलून तर काहींनी खुर्च्यांवर चढून जोरदार घोषणाबाजी केली. 

जवळपास पंधरा मिनिटे चाललेला गोंधळ कसाबसा आटोक्‍यात येत असतानाच पुन्हा वाद पेटला. दुसऱ्यांदा झालेल्या गोंधळामुळे ऍड. अणे यांनी काढता पाय घेतला. विशेष म्हणजे या गोंधळाची तीव्रता इतकी होती की, मध्यस्थी करायला गेलेल्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. 

दरम्यान, गोंधळ शांत झाल्यावर अडसूळ भाषणासाठी उभे झाले व गोंधळाचे समर्थन केले. त्यांचे भाषण सुरू असताना वेगळ्या विदर्भाचे समर्थक प्रबीर चक्रवर्ती यांनी हुतात्म्यांच्या उल्लेखावर आक्षेप घेतला आणि पुन्हा एकदा गोंधळाला सुरुवात झाली. त्यामुळे चर्चासत्र थांबवून प्रकाशन सोहळा आटोपण्यात आला. प्रकाशन झाल्यानंतर अडसूळही सभागृहातून बाहेर पडले. 

गोंधळ पूर्वनियोजित? 
आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यापेक्षा वेगळ्या विदर्भावरील चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. ऍड. श्रीहरी अणे यांच्यासोबत उपस्थित झालेले विदर्भवादी तसेच आनंद अडसूळ व प्रकाश जाधव यांच्यासोबत आलेले शिवसेनेचे कार्यकर्ते या दोनच गटांनी अर्ध्यापेक्षा अधिक सभागृह व्यापले होते. अणेंचे पहिले वाक्‍य पूर्ण होण्यापूर्वीच दोन्ही गटांकडून सुरू झालेली नारेबाजी गोंधळ पूर्वनियोजित असल्याची शंका निर्माण करणारी होती. 

Web Title: Verbal spat between Vidarbha supporters and Maharashtra supporters