कोरोना योद्धेच नाहीत लसीकरणासाठी तयार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी का केली नाही अद्याप नोंदणी?

very few corona worriers registered for vaccination in nagpur
very few corona worriers registered for vaccination in nagpur

नागपूर : कोरोना लसीकरण मोहिमेत सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेवक असलेल्या कोरोना योद्धांचे लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी नोंदणी केलेल्या आकडेवारीवरून नागपूर जिल्ह्यातील कोरोना योद्धेच लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे. वारंवार सूचना देऊनही नागपूर जिल्ह्यात अवघे ६२.५ टक्के कोरोना योद्ध्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. 

कोरोना विषाणूविरुद्ध सुरू झालेल्या लढाईत ११ व्या महिन्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होणार आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे सरकारी तसेच खासगीतील डॉक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्यसेवकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ८८ हजार हेल्थवर्कर (कोरोना योद्धे) कोरोनाविरद्ध लढत आहेत. यापैकी ७० हजार ५३२ जणांची नोंदणी झाली आहे. यात शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील कोरोना योद्ध्यांची संख्या ४९ हजार ५७८ आहे. तर खासगी रुग्णसेवेतील ३८ हजार ४२४ आरोग्यसेवकांची नोंदणी झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयातील २९ हजार १८० कोरोना योद्धे कोरोनाच्या कुरुक्षेत्रात लढत असताना लसीकरणासाठी मात्र केवळ १८ हजार २५२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष असे की, या नोंदणीपासून डॉक्टर दूर असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. भंडारा जिल्ह्यात ९ हजार ६०४ कर्मचारी कार्यरत असताना येथील ७ हजार १२४ कर्मचाऱ्याची नोंदणी झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात ८ हजार ८५३ आरोग्य सेवक कोरोनाशी लढत असताना लसीकरणासाठी मात्र ६ हजार ७६५ जणांनी नोंदणी केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सरकारी आणि खासगीतील १५ हजार ३३३ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, यापैकी १४ हजार २९ कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ९ हजार ८८९ कर्मचारी कोरोनाविरुद्ध लढत आहेत. यापैकी ९ हजार ०४० कर्मचारी लसीकरणासाठी इच्छुक आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यात १०० टक्के नोंदणी - 
वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात बऱ्यापैकी लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात कार्यरत १०९२७ तर खासगी रुग्णालयात ४२१६ असे एकूण १५ हजार १४३ कोरोना योद्धे कार्यरत असून त्यांची १०० कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी करून घेतली आहे. असे आहेत जिल्हानिहाय हेल्थ वर्कर 

लसीकरणासाठी कर्मचारी नोंदणी टक्केवारीत - 

  • नागपूर - ६२.५ 
  • वर्धा - ९२.७ 
  • भंडारा - ७४.२ 
  • चंद्रपूर  - १०० 
  • गडचिरोली - ९१.४ 
  • गोंदिया - ७६.४ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com