‘माहेरघर’ने रोखले मातामृत्यू, तरीही मेळघाटात अल्प प्रतिसाद

राज इंगळे 
Tuesday, 15 December 2020

मेळघाटसह राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी माहेरघर योजना आधार ठरत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रांत ही योजना सुरू आहे.

अचलपूर (जि. अमरावती) : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी आरोग्य विभागाची माहेरघर योजना आधार ठरत आहे. मेळघाटातील नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रांत माहेरघर योजना सुरू आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत अनेक महिलांचे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले. ज्यामुळे मातामृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आजही मेळघाटात मोठ्या प्रमाणात आदिवासी गर्भवती महिलांकडून या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

मेळघाटसह राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी माहेरघर योजना आधार ठरत आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रांत ही योजना सुरू आहे. या माहेरघर योजनेमुळे वर्षभरात अनेक महिलांचे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत आहे. मात्र या योजनेला मेळघाटात आदिवासी गर्भवती महिलांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - मातोश्रीवर उरकला प्रेम विवाह अन् नामकरण सोहळा, पाणावले अनेकांचे डोळे
 

त्यामुळे मेळघाटात या योजनेला पाहिजे तेवढा आरोग्य विभागाला लाभ होताना दिसून येत नाही. दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये पोहोचणे काहीसे जिकिरीचे बनते. त्यामुळे प्रसूतीच्या चार ते पाच दिवस आधी गर्भवतींना आरोग्य संस्थांमध्ये दाखल केले जाते. त्यांना माहेरघर योजनेतून सर्वंकष सेवा दिली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या अमरावती जिल्ह्यात नऊ आरोग्य संस्थांमध्ये योजना कार्यान्वित आहे. मात्र, या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने मेळघाटातील मातामृत्यूला आरोग्य विभागाला शून्य उद्धिष्टपूर्ती करण्यास यश मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसून येते.
 

माहेरघर योजनेत गर्भवती महिलेस मजुरी

राज्यशासन मातामृत्यू रोखण्यासाठी जे प्रयत्न करीत आहे, त्यासाठी माहेरघर योजना साहाय्यभूत ठरत आहे. दुर्गम भागात संपर्क साधनांच्या अभावामुळे रुग्णवाहिका वेळेवर बोलवणे शक्‍य होत नाही. अशावेळी माहेरघरमुळे गर्भवतींना चार ते पाच दिवस आधीच दाखल करून घेतले जात असल्यामुळे प्रसूतीत अडचण येत नाही. यामुळेच
दुर्गम भागात माहेरघर योजनेमुळे संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाल्याने माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन 200 रुपये देण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
 

महिलांचा अल्प प्रतिसाद
गर्भवती महिलांना बुडीत मजुरी देण्यात येते, तरीसुद्धा मेळघाटात या योजनेला गर्भवती मातांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ही योजना गर्भवती महिलांच्या दृष्टीने लाभदायक असूनही माहेरघर योजना मेळघाटात यशस्वी होताना दिसून येत नाही. 
- डॉ. शशिकांत पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी,  चिखलदरा.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: very poor response to the Maherghar scheme in Melghat