esakal | Yavatmal: गरिबाची कणगी नको करू खाली; आणेवारीकडे शेतकऱ्याचे लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rain damage Kharip crops

यवतमाळ : गरिबाची कणगी नको करू खाली; आणेवारीकडे शेतकऱ्याचे लक्ष

sakal_logo
By
राजकुमार भीतकर rajkumarbhitkar.ytl@gmail.com

यवतमाळ : अरे वो पाण्या, कावून तोंडचा घास हिसकावता राजा; कावून इतका बरसून रायला राजा घेतं का रे जीव, तोंडचा घास हिसकल्याशिवाय तुले येत नाही का रे कीव? या गद्य कवितेच्या ओंळीमध्ये जिल्ह्यातील ओल्या दुष्काळाचे पडसाद उमटले आहेत. साहित्यिक संवेदनशील असतात, ते अंतरप्रेरणेतून लिहितात. त्यांना लोकांचे दु:ख कळते, वेदनाही कळतात. जिल्ह्यातील बोरीअरब येथील नितीन कोल्हे या तरुण कवीने ओल्या दुष्काळाचे कवितेतून मांडलेले हे वास्तव म्हणजे शेतकर्‍यांची काळजातून निघालेला वेदनांचा आवाज आहे.

फसवून आज गेला, रडवून आज गेला...

पाऊस वेदनांना, उसवून आज गेला...

महेश पाटील अहदमपूर यांच्या गझलेच्या या ओळी पावसाचा कहरच व्यक्त करतात. यंदा तोंडाजवळ आलेला घास पावसाने हिसकावला आहे. खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके हातची गेली आहेत. यंदा खरिपाच्या सुरवातीपासून दमदार पाऊस होता. सप्टेंबर महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली. पाऊस सारखा लागून पडल्याने काढणीला आलेले सोयाबीन पावसात सापडले. त्यामुळे शेंगांना कोंब फुटली. तर, शेतशिवारात पावसाचे डबके साचल्याने कपाशीचे बोंडे सडली. जोरदार पावसाने कपाशी आडवी झाली.

हेही वाचा: अनील देशमुखच्या ईडीविरोधातील याचिकेवर 4 ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी

नदीनाल्यांना महापूर गेल्याने काठावरील शेतजमीन खरडून गेली. गुलाब चक्रीवादळाचाही फटका जिल्ह्याला बसला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश स्थिती आहे. याकडे पालकमंत्री असो की जिल्ह्यातील शेतकरी नेते, वा जिल्हा प्रशासनातील अधिकारी कुणाचेही लक्ष नाही. खासदार, आमदार कोणीही बांधावर गेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करीत असलेले शेतकरी नापिकीचाही सामना करीत आहेत.

दरवर्षी 30 सप्टेंबरला पिकांची नजरअंदाज पैसेवारी काढली जाते. आज (ता. 30) त्यात ओल्या दुष्काळाची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. उद्यापासून पालकमंत्री संदीपान भुमरे जिल्ह्यात तीन दिवस मुक्कामी आहेत. ते बांधावर गेले तर जिल्हा प्रशासन, कृषी विभागही बांधावर पोहोचेल. पिकांचे झालेले नुकसान त्यांना बघता येईल. जिल्हा नियोजन समितीची बैठक 1 नोव्हेंबरला असून या बैठकीतही ओल्या दुष्काळावर ठराव घेतला जावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

यानिमित्ताने येणार्‍या सर्व खासदार व आमदारांनी शेतकर्‍यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा आहे. कवींनी लिहिले, लोकांना ऐकायला बरे वाटते. मात्र कवितेतील वेदनांची जाणीव राज्यकर्त्यांना व्हायला हवी. कविंप्रमाणेच तेही संवेदनशील झाले तर शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. नाहीतर कवीप्रमाणेच शेतकर्‍यांनाही विठ्ठलाच्या चरणी ’गरिबाची कणगी नको करू खाली’ अशी विनवणी करीत समाधान मानावे लागणार आहे.

loading image
go to top