डॉ. संजय देशपांडे म्हणतात, लैंगिक शिक्षण आवश्‍यक

vidarbh nagpur sanjay deshpande sex education
vidarbh nagpur sanjay deshpande sex education

नागपूर ः पौगंडावस्थेतील नातेसंबंध आणि लैंगिकता यामुळे विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे लैंगिकतेसंबंधी मोकळे वातावरण कुटुंबात तयार करावे. मुलांच्या मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे कोणताही संकोच न करता द्यावीत. यातून मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल आणि शालेय अभ्यासक्रमात हा विषय योग्यप्रकारे शिकवण्यास मदत होईल, असे मत प्रसिद्ध लैंगिकरोग तज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे यांनी व्यक्त केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखा आणि स्कूल हेडमास्टर्स चॅरिटेबल असोसिएशनच्या सहकार्यातून पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शालेय शिक्षकांनी हाताळावयाची भूमिका या विषयावर शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डॉ. देशपांडे बोलत होते.

डॉ. देशपांडे म्हणाले, एकूण लोकसंख्येच्या 23 टक्के ही किशोरवयीन मुले असतात. या वयात ते शालेय शिक्षण घेत असतात. या वयात शारीरिक वाढीच्या वेळी भावनिक, मानसिक आणि लैंगिक बदल होतात. याबाबत समाजात, कुटुंबात, शाळा-कॉलेजमध्ये योग्य माहिती मिळणे दुरापास्त असते.

चुकीच्या माहितीमुळे किशोरवयीन मुलामुलींमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही, याची काळजी पालकांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी घ्यावी. आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजूषा गिरी, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे उपस्थित होते. शाळांमधून लैंगिक शिक्षण देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी शिक्षकांना जागृत करणे क्रमप्राप्त आहे.

शाळांमधील शिक्षक लैंगिक शिक्षण देण्यासाठी सज्ज असले आणि त्या अनुषंगाने लहानग्यांना लैंगिक शिक्षण दिले तर आपण पुढे घडणाऱ्या लैंगिकतेसंबंधातील तसेच बलात्कारासारख्या घटना कमी करू शकतो. मात्र, त्यासाठी लैंगिक शिक्षणासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे मत डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी व्यक्त केले.

डॉ. मंजूषा गिरी यांनी मेंदूची वाढ, नैतिक दबाव आणि माध्यमे तसेच व्यसनांतून होणाऱ्या परिणामांची कारणमीमांसा केली. मनाचा कल (मूड) सतत बदलणे, मनातील गोंधळ, व्यसनाधीनता यातून मानसिक विकासात अडथळा ठरतो, असे डॉ. गिरी म्हणाल्या.

600 शिक्षक कार्यशाळेत सहभागी

यावेळी शिक्षकांसाठी सीपीआर आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रथमोपचार या विषयावरही मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षणाधिकारी पाटवे, संस्थेचे अध्यक्ष जाफर खान, सचिव दिलीप बोसे, संदीप गायकवाड, अख्तरुन्निसा खान, लक्ष्मी मोझरकर यांच्यासह 600 शिक्षक कार्यशाळेत सहभागी झाले होते.

डॉ. अर्चना कोठारी, डॉ. राफत खान, डॉ. प्रकाश देव, डॉ. अलोक उमरे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. शिरीष मोदी, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. वंदना काटे आणि डॉ. विजय उपाध्याय उपस्थित होते. प्रास्ताविक आयएमए अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com