esakal | Vidarbh: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावरील संकट गडद
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन

विदर्भ : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यावरील संकट गडद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन : शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसताना मे महिन्यात सोयाबीनला दहा हजार रुपयाच्यावर असलेला भाव अचानक सरासरी पाच हजार रुपयावर आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद झाले आहे. यंदाच्या खरिपातील सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून, नवीन सोयाबीनची बाजारातील आवक वाढली असताना भावात मात्र चांगलीच घसरण झाली आहे.

मे महिन्यात दहा हजाराचा टप्पा पार करणाऱ्या सोयाबीनला हंगामात मात्र, सरासरी ५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सध्या हंगामाची जेमतेम सुरुवात झाली असताना शेतमाल भावाची ही स्थिती आहे. अजून आवक वाढल्यावर काय? या प्रश्नाने शेतकरी चिंतातूर होत आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टी व सततधार पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाही शिरपूर व परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. परिसरात संततधार व अतिवृष्टीने बहुतांश पीक हातचे गेल्यातच जमा आहेत. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झाले आहे. बऱ्याच भागात सोयाबीन जळून गेले तर, अनेक ठिकाअणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना ही करावा लागला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच नुकसान सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर बाजारातील भाव घसरल्याने त्याच्या नुकसानीत आणखीनच भर पडली आहे.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

खरिपातील नवीन हंगामास प्रारंभ झाला आहे. एप्रिल-मे महिन्यात सोयाबीनने दहा हजार रुपयाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर भाव स्थिर राहिले नसले तरी, चढे दर मात्र कायम होते. केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. स्थानिक बाजार समितीत लिलावात सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. गत सप्ताहात नवीन सोयाबीनला याच श्रेणीत भाव मिळाला आहे. आवक वाढल्यानंतर पुन्हा भाव घसरण्याची शक्यता खरेदीदारांकडून व्यक्त केली जात आहे. ऐन हंगामात भाव कोसळू लागल्याने शेतकरी हवालदिल होऊ लागला आहे.

बाजारातील तेजी कायम राहावी अशी, अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. या हंगामात सोयाबीनची आवक वाढेल तसा भाव कमी होत जाईल असा, अंदाज व्यक्त केल्या जात आहे. शेतकऱ्यांना सर्वसाधारण भाव मिळावा अशी, अपेक्षा त्यांना आहे. केंद्राचे आयात धोरण व स्टॉक लिमीट याचा एकंदरीत परिणाम शेतमाल खरेदीवर होईल, त्यामुळे खरीददार माल असला तरी, खरेदी करण्यासाठी पुढे येणार नाहीत असाही अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

ना... पंचनामे ना... मदत

गत पंधरा दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे सरासरी तीस ते चाळीस टक्के सोयाबीन पाण्यात गेले. अनेक ठिकाणी सत्तर मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. प्रशासनाने सरकसकट मदतीचे प्रस्ताव मंजूर करण्याएवजी पंचनाम्याची घोषणा केली. मात्र, ना पंचनामे झाले ना मदत जाहीर झाली. आता भावही गडगडल्याने शेतकरी घायकुतीला आला आहे.

loading image
go to top