विदर्भाला भाजपमुक्त करणार - अणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

नागपूर - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली जाईल, असे आश्‍वासन देणारी भाजप सत्तेत येताच बदलली आहे. त्यांचा खोटारडेपणा वैदर्भीयांच्या जनतेसमोर नेण्यात असून विदर्भ निर्माण यात्रेच्या माध्यमातून विदर्भाला भाजपमुक्त करून, असा इशारा राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी दिला.

नागपूर - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यास स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली जाईल, असे आश्‍वासन देणारी भाजप सत्तेत येताच बदलली आहे. त्यांचा खोटारडेपणा वैदर्भीयांच्या जनतेसमोर नेण्यात असून विदर्भ निर्माण यात्रेच्या माध्यमातून विदर्भाला भाजपमुक्त करून, असा इशारा राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी दिला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने बुधवारपासून विदर्भ निर्माण यात्रेस प्रारंभ झाला. यात्रेचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आला. यावेळी ऍड. वामनराव चटप, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, आम आदमी पक्षाचे नेते ब्रिगेडीयर सुधीर सावंत, देवेंद्र वानखेडे, विदर्भ माझा पक्षाचे नेते राजकुमार तिरपुडे, मंगेश तेलंग, सुनील चोखारे, रुपेश फुंड आदी उपस्थित होते.

ऍड. वामनराव चटप म्हणाले, विदर्भ निर्माण यात्रा लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे. या माध्यमातून निवडणुकीत तिसरी आघाडी म्हणून पर्याय देणार असल्याचे ते म्हणाले. आम आदमी पक्ष स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहे. विदर्भ निर्माण महामंचाचे घटक पक्ष म्हणून आम्ही लोकसभा, विधानसभेच्या सर्व जागा लढून भाजप व कॉंग्रेसला पर्याय देऊ, असे सुधीर सावंत म्हणाले. येत्या 2019 च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य द्या, नाही तर खुर्च्या खाली करा, असा इशारा भाजप देण्यात येणार असल्याचे नेवले म्हणाले. ही यात्रा पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात काढण्यात येणार आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात मुख्य संयोजन राम नेवले यांच्या नेतृत्वात निघणार आहे. तर पश्‍चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व अकोला जिल्ह्यात ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्त्वात काढण्यात येणार आहे. 12 जानेवारी दोन्ही यात्रा नागपूरला दुपारी 1 वाजता पोहोचणार असून हिंदी मोरभवन येथे यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी रंजना मामर्डे, डॉ. रमेश गजबे, देवीदास लांजेवार, राजू नागुलवार, ऍड. निरज खांदेवाले, अरूण केदार, दिलीप नरवडीया, धर्मराज रेवतकर, अरविंद सांदेकर, मुकेश मासूरकर, विजया धोटे, विष्णू आष्टीकर, अनिल तिडके, पौर्णिमा भिलावे, प्रिती दिडमुठे, रविना श्‍यामकुळे, घनश्‍याम पुरोहित, राजू काळे, गणेश शर्मा आदींसह मोठ्या संख्येन कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Vidarbha to get rid of BJP