विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेतील घोटाळ्याने शेतकरी संकटात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

पोंभूर्णा (जि. चंद्रपूर) : देवाडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेतील आर्थिक गैरव्यहारामुळे परिसरातील शेतकरी ऐन खरीप हंगामात संकटात सापडले आहेत. या बॅंकेचे खातेधारक बहुतांश शेतकरी आहेत. काही शेतकरी खात्यातून पैसे काढायला बॅंकेत गेले तेव्हा त्यांच्या खात्यात पैसेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे आता शेतीसाठी पैशाची जुळवाजुळव कशी करायची, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक 1984 पासून देवाडा येथे सुरू आहे. या बॅंकेत परिसरातील सुमारे दीड हजार शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी खातेधारक आहेत. सोबतच बचत गटाची खाती सुद्धा आहे. बॅंकेत काही खातेदार शेतकरी पैसे काढायला गेले तेव्हा त्यांच्या खात्यात पैसेच नसल्याचे समोर आले. सुमारे 28 खातेधारकांच्या खात्यातून पैसे गहाळ झाले असून जवळपास वीस लाख रुपयांचा घोटाळा असल्याचे समजते.
या आर्थिक गैरव्यवहाराची वाच्यता झाल्यानंतर अनेकांनी बॅंकेत आपले खाते तपासण्यासाठी धाव घेतली. यात महिला बचत गटांचाही समावेश होता. त्यांच्याही खात्यातील रकमेत तफावत असल्याचे आढळून आले. तालुक्‍यातील जामखूर्द येथील श्रीगिरीवार यांनी जानेवारी 2019 मध्ये 27 हजार रुपये बॅंकेत जमा केले होते. पासबुकात तशी नोंद घेतली. आता ही रक्कमच बॅंकेच्या रेकार्डमध्ये नाही. याशिवाय मारुती साखरे (1.60 लाख), भुलाबाई मोगरकार (50 हजार), शेवंता घुग्घुसकर (45 हजार), अशोक घुग्घुसकर (28 हजार), एकनाथ लेनगुरे (45 हजार), मधुकर सातरे (11 हजार), विपुल सातरे (20 हजार), शामा मोगरकार (30 हजार), रूपेश कोडापे (11 हजार) यांच्यासह अनेक खातेधारकांची रक्कम गहाळ झाल्याचे समोर आले आहे.
दहा दिवसात रक्कम जमा होणार
बॅंकेने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. येत्या 10 दिवसात खातेधारकांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे बॅंक व्यवस्थापक प्रदीप विश्‍वोजवार यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha Kokan rural bank scam : Farmer's are in trouble