मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागात वैद्यकीय संचालक धडकले तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
01.01 AM

अधिष्ठाता कक्षात थेट तक्रार करण्यात आल्यामुळे या प्रकरणाला गंभीरतेने घेण्यात आले. या विभागात रिपोर्टसाठी अर्थात सीडीमध्ये अहवाल रुग्णाला देताना उशीर होतो.

नागपूर ः वयाची पन्नाशी गाठलेले हे परदेशी श्रीवास नावाचे रुग्णाला सीटी स्कॅनच्या निदानाचा अहवाल असलेली "सीडी' न दिल्यामुळे मागील साडेतीन महिन्यांपासून उपचारापासून वंचित राहावे लागले असल्याची धक्कादायक माहिती दै. सकाळने पुढे आणली. वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये आले असता, ते थेट दुपारी बाराच्या ठोक्‍याला रेडिओलॉजी विभागात धडकले. या विभागाला चांगलेच धारेवर धरले.

डॉक्‍टरांनी सांगितल्यानुसार 21 ऑगस्ट रोजी 800 रुपये शुल्क भरून सीटी स्कॅन काढला. मात्र, केवळ 10 रुपयांची सीडी या रुग्णाने आणून न दिल्यामुळे त्याला हा अहवाल मिळाला नाही. वारंवार खेटा मारूनही अहवाल न मिळाल्याने रुग्णाला मागील साडेतीन महिने उपचारापासून वंचित राहावे लागले. तोंडातील दंतशी संबंधित हा सीटी स्कॅन असल्याने निदानाची सीडी अर्थात (रिपार्ट)ची मागणी डॉक्‍टरांकडून होत असे. अधिष्ठाता कक्षात थेट तक्रार करण्यात आल्यामुळे या प्रकरणाला गंभीरतेने घेण्यात आले. या विभागात रिपोर्टसाठी अर्थात सीडीमध्ये अहवाल रुग्णाला देताना उशीर होतो.

वेटिंग लिस्ट कमी करा

वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांनी रेडिओलॉजी विभागात भेट दिली. विभागप्रमुख डॉ. आरती आनंद यांनी विभागातील कामाची माहिती दिली. दर दिवसाला 25 एमआरआय, 100 सीटी स्कॅन, 400 वर एक्‍स रे काढण्यात येतात. यावेळी डॉ. लहाने यांनी विभागप्रमुख डॉ. आरती आनंद यांच्यासह प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांशी चर्चा केली. रुग्णांची गर्दी लक्षात घेता मनुष्यबळ अपुरे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी वेटिंग लिस्ट कमी करण्यासंदर्भात डॉ. लहाने यांनी सूचना केली.

मेयो, मेडिकलमध्ये खाटा आरक्षित

येत्या 16 डिसेंबरपासून उपराजधानीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे निमित्त साधून वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेडिकलमध्ये बैठक घेतली. मेयो आणि मेडिकलमध्ये काही खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या. मेडिकल, मेयो, आरोग्य विभागातील सुमारे 70 डॉक्‍टर सेवा देतील. याशिवाय फिरते वैद्यकीय पथक, औषधालय तसेच इतर वैद्यकीय सोयींचा आढावा वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांनी घेतला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha nagpur Radiology Department Medical director