डॉ. अमित समर्थ यांनी घडविला इतिहास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पहिल्याच प्रयत्नात 'रॅम' पूर्ण करणारे पहिले भारतीय

नागपूर: नागपूरचे युवा सायलकपटू डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वात कठिण व आव्हानात्मक मानली जाणारी पाच हजार किमी अंतराची "रेस अक्रॉस अमेरिका' (रॅम) ही सायकल शर्यत पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण केली. असा बहूमान पटकाविणारे डॉ. समर्थ हे पहिले भारतीय सायकलपटू ठरले आहेत.

पहिल्याच प्रयत्नात 'रॅम' पूर्ण करणारे पहिले भारतीय

नागपूर: नागपूरचे युवा सायलकपटू डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वात कठिण व आव्हानात्मक मानली जाणारी पाच हजार किमी अंतराची "रेस अक्रॉस अमेरिका' (रॅम) ही सायकल शर्यत पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण केली. असा बहूमान पटकाविणारे डॉ. समर्थ हे पहिले भारतीय सायकलपटू ठरले आहेत.

अमेरिकेच्या पूर्व भागातून आरंभ होऊन पश्‍चिमेकडे शेवट होणारी ही शर्यत सहभागी सायकलपटूला 12 दिवसांत पूर्ण करणे आवश्‍यक असते. 35 वर्षीय डॉ. समर्थ यांनी "स्टॅमिना' आणि "स्ट्रेंथ'ची परिक्षा घेणारी ही शर्यत 11 दिवस 21 तास आणि 11 मिनिटांत पूर्ण करून नागपूर व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. गेल्या डिसेंबरमध्ये बुसेलटोन येथे पार पडलेली ट्रायथ्लॉन पूर्ण करून त्यांनी "आयर्नमॅन' होण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारे ते मध्य भारतातील पहिले सायकलपटू ठरले होते. अन्य एक भारतीय नाशिकचे श्रीनिवास गोकुलनाथ यांनीही दुसऱ्या प्रयत्नात "रॅम' पूर्ण केली. त्यांनी हे अंतर 11 दिवस 18 तास 45 मिनिटांत कापले.

"रेस अक्रॉस अमेरिका'मध्ये सायकलपटूला अनेक आव्हानांना तोंड देत खडबडीत व डोंगराळ भागातून सायकल चालवावी लागते. त्यामुळेच 1982 पासून सुरू झालेली "रॅम' आतापर्यंत एकाही भारतियाला पूर्ण करता आली नाही. स्पर्धेत जगभरातील 25 देशांचे पन्नासावर सायकलपटू सहभागी झाले होते. सोलो आणि टीम इव्हेंट अशा दोन प्रकारांत ही स्पर्धा होते. डॉ. समर्थ यांनी सोलो कॅटेगरीत भाग घेतला.

या स्पर्धेसाठी डॉ. समर्थ गेल्या एक-दीड वर्षांपासून कठिण सराव करीत होते. स्पर्धेसाठी खास बेल्जियममधून आयात केलेल्या 18 लाख रुपये किंमतीच्या आधुनिक स्कॉट कंपनीच्या ऍडिक्‍ट, फॉईल व प्लाझमा या तीन सायकलींचा वापर केला. "रेस अक्रॉस अमेरिका'मध्ये डॉ. समर्थ यांच्यासोबत त्यांची पत्नी मुकूल, देवनाथ पिल्ले, सुनील डोईजड, चेतन थाटे, अरुणा पुरोहित, निखिल चव्हाण, भानू राजगोपालन इत्यादी सहकारी होते. "रॅम' पूर्ण करून नागपूरचा गौरव वाढविल्याबद्‌दल सहकाऱ्यांनी डॉ. समर्थ यांचे अभिनंदन केले.

Web Title: vidarbha news dr amit samarth and race across america