वणीत शुक्रवारपासून विदर्भ साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

वणी - अणे-शेवाळकरांचा संपन्न वारसा असणाऱ्या व कोळसा-कापसाने समृद्ध  वणीतील राम शेवाळकर परिसरात विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन शुक्रवार, शनिवार व रविवारी (ता. १९, २० व २१) होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. गिरीश गोपाळ देशपांडे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी अडीचला बाबासाहेब देशमुख स्मृती व्यासपीठावर संमेलनाचे उद्‌घाटन होईल. 

वणी - अणे-शेवाळकरांचा संपन्न वारसा असणाऱ्या व कोळसा-कापसाने समृद्ध  वणीतील राम शेवाळकर परिसरात विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन शुक्रवार, शनिवार व रविवारी (ता. १९, २० व २१) होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. गिरीश गोपाळ देशपांडे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी अडीचला बाबासाहेब देशमुख स्मृती व्यासपीठावर संमेलनाचे उद्‌घाटन होईल. 

याप्रसंगी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राज दत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार व संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ‘बारोमासकार’ डॉ. सदानंद देशमुख प्रमुख पाहुणे असतील. शुक्रवारी (ता. १९) सकाळी दहाला नगर वाचनालय ते राम शेवाळकर परिसर अशी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. या उद्‌घाटन समारोहास विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर,  संमेलन समितीच्या आमंत्रक शुभदा फडणवीस उपस्थित राहतील. उद्‌घाटनानंतर सायंकाळी साडेपाचला कविसंमेलन, तर रात्री आठला किरण पोत्रेकर लिखित व संजय भाकरे फाउंडेशनतर्फे निर्मिती ‘बाप हा बापच असतो’ या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण होईल. शनिवारी (ता. २०) सकाळी नऊला ‘संतांचे समाजभान’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल. दुपारी अकराला ‘शेतकऱ्यांची दैना आणि आपण सगळे’ या विषयावर दुसरा परिसंवाद होईल. 

त्यानंतर दुपारी एकला कविवर्य विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दुपारी चारला ‘आधुनिक तंत्रज्ञानाचे अभिजात साहित्य आणि कलेला आव्हान’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी साडेपाचला कविसंमेलन होईल. रात्री ‘वैदर्भीय गीतगंगा’ हा लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम रात्री आठला सादर होणार आहे. रविवारी (ता. २१) सकाळी दहाला डॉ. अभय बंग यांचे ‘विनोबा-शांतता कोर्ट चालू आहे’, या विषयावर भाषण होईल. सकाळी अकराला कथाकथन, दुपारी साडेबाराला ‘माध्यमांची बांधीलकी आणि अभिव्यक्ती’ या विषयांवर परिसंवाद होईल. संमेलनात सुप्रसिद्ध छायाचित्रकार रामदास पद्मावार यांचे छायाचित्र प्रदर्शन, रक्तचित्रकार प्रल्हाद ठक, व्यंग्यचित्रकार आनंद कसंबे, रेखाचित्रकार सुदर्शन बारापात्रे यांच्या कलाकृतीचे विशेष प्रदर्शन संमेलनाचे आकर्षण राहणार आहे. संमेलनाचा समारोप दुपारी दोनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत होईल. समारोपानंतर रात्री आठला स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

साहित्य रसिकांनी या संमेलनाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संयोजक माधव सरपटवार व शाखाध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे यांच्यासह आयोजकांनी केले आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले. स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सर्व पदाधिकारी, तसेच जनतेने पुढाकार घेतला आहे.

Web Title: vidarbha news vidarbha sahitya sammelan wani