चिमुकलीने खाऊच्या पैशातून खोदला शौचालयाचा खड्डा...

development story
development story

दिग्रस (जिल्हा.यवतमाळ) - "आईवडील दोघेही रोजमजुरीच्या शोधात पुण्यात गेलेले. घरी दोन बहिणींचेच वास्तव्य. घरी शौचालय नसल्याची खंत. त्यासाठी धडपड सुरू झाली. परंतु, काय करायचे कळेना! गावात गुड मॉर्निंग पथक आले. त्यांनी ’खड्डा तुम्ही खोदा, वरील बांधकाम सरकार करून देते’, हा दिलेला कानमंत्र त्या चिमुकलीने ऐकला. शाळेतील बचत बँकेत जमा केलेल्या खाऊच्या पैशातून तिने शौचालयाचा खड्डा खोदला''. जे मोठ्यांना जमले नाही, ते त्या चिमुकलीने करून दाखविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावागावांत शौचालय बांधकाम करण्यासाठी दिग्रस पंचायत समितीचे गुड मॉर्निंग पथक जनजागृती करीत आहे. तालुक्यातील आमला (तांडा) येथे हे पथक पोहोचले. त्यांनी नागरिकांना शौचालय बांधकामाची माहिती दिली. ’खड्डा तुम्ही खोदून द्या, सरकार शौचालयाचे बांधकाम करून देते’, असे नागरिकांना सांगितले. हे ऐकून आठवीत शिकणार्‍या निकिता राजेश राठोड हिची उत्सुकता शिगेला पोहोचली. तिने खाऊचे पैसे व शाळेच्या बचत बँकेत जमा केलेले पैसे एकत्र करून सरपंच किरण तायडे, पोलिस पाटील माया जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने 800 रुपयांत खड्डा खोदून घेतला. दुसर्‍या दिवशी गुड मॉर्निंग पथक गावात येताच त्यांना आता शौचालय बांधून द्या, अशी विनंती केली. तिची इच्छाशक्ती बघून गुड मॉर्निंग पथकाने सर्व कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून निकीताच्या घरी शौचालयाचे बांधकाम सुरू केले. तिच्या या धडपडीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. बालवयात तिने इतरांसमोर असा आदर्श ठेवला आहे.

तालुक्यातील आमला (तांडा) येथे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सहायक गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांच्या मार्गदर्शनात एस. के. गुळधणे, आर. व्ही. ढोले, एम. पी. यादव, ग्रामसेवक खीरेकार, धवस, ठाकरे, राऊत व पशुधन पर्यवेक्षक के. टी. जाधव, मोखचे पशुधन पर्यवेक्षक सुनील राठोड आदींसह शनिवारी (ता. तीन) ‘सकाळ चमू’ने भेट दिली. त्या चिमुकलीची धडपड पाहून तिचे कौतुक केले.

शौचाला उघड्यावर जायची लाज वाटते : निकिता राठोड

गावात घरोघरी शौचालय बांधले जात आहेत. उघड्यावर शौचास जाणार्‍यांची संख्या घटली. त्यामुळे आम्हा बहिणींना उघड्यावर शौचाला जाण्यास लाज वाटत होती. घरची परिस्थिती गरीब असल्याने आईवडील रोजमजुरीसाठी पुण्याला गेले आहेत. घरी मी व माझी लहान बहीण अस्मिता दोघेच राहतो. सुटीच्या दिवशी मोलमजुरीला जातो. आईवडिलांनी पाठवलेल्या पैशात शिक्षणाचा खर्च व उदरनिर्वाह चालतो. घरची सर्व कामे करून अभ्यास करतो. परंतु, आपल्या घरीसुद्धा शौचालय असावे, असे सतत वाटत होते. ते कसे होणार याची चिंता होती. त्यामुळे गुड मॉर्निंग पथकाला भेटले. त्यांच्या मार्गदर्शनात शौचालयाचे काम सुरू करण्यात आले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com