विदर्भात रस्ते उभारणी सुस्तावली

विवेक मेतकर
बुधवार, 13 जून 2018

अकोला - रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते यावरून सातत्याने चर्चेत राहणाऱ्या विदर्भाची रस्ते विकासातील कासवगती कायम आहे. मात्र, मराठवाड्याने निश्‍चित लक्ष्यपूर्ती करत 118 टक्के रस्त्यांची विकासकामे केली असल्याचे विदर्भ विकास मंडळाने सहा महिन्यांआधी विधिमंडळात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अकोला - रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते यावरून सातत्याने चर्चेत राहणाऱ्या विदर्भाची रस्ते विकासातील कासवगती कायम आहे. मात्र, मराठवाड्याने निश्‍चित लक्ष्यपूर्ती करत 118 टक्के रस्त्यांची विकासकामे केली असल्याचे विदर्भ विकास मंडळाने सहा महिन्यांआधी विधिमंडळात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

विदर्भातील रस्ते विकासाचा वेग राज्याच्या सरासरीच्या तुलनेतही बराच मागे पडल्याचे मंडळाने नमूद केले आहे. इंडियन रोड कॉंग्रेसच्या मार्गदर्शनानुसार राज्यात रस्ते विकासाच्या 2001 ते 2021 या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेनुसार राज्यात 3,27, 069 किमी लांबीच्या रस्ते विकासाचे लक्ष्य ठेवले गेले. त्यात विदर्भात 94, 241 किमी, कोकण, नाशिक व पुणे विभागाचा समावेश असलेल्या उर्वरित महाराष्ट्राचे 1,77,173; तर मराठवाड्याचे 55, 654 किलोमीटर रस्ते विकासाचे लक्ष्य आहे. लक्ष्याच्या तुलनेत विदर्भातील रस्ते विकासाचे 2016 पर्यंतचे कामाचे प्रमाण 66 हजार 209 किलोमीटर म्हणजेच केवळ 70 टक्केच आहे. मराठवाड्याने रस्ते विकासाचे लक्ष्य गाठत त्याहीपलीकडे म्हणजेच 65 हजार 685 किलोमीटर रस्त्यांची (118 टक्के) उभारणी झाल्याचे दिसून आले. रस्ते विकासात उर्वरित महाराष्ट्रदेखील आघाडीवर असून, 1 लाख 68 हजार 695 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास साधत उर्वरित महाराष्ट्राने 95 टक्के लक्ष्य पूर्ण केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विदर्भात 26 हजार कि.मी. रस्ते
राज्यातील एकूण 1 लाख 45 हजार 881 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांमध्ये विदर्भात केवळ 26 हजार 282 किलोमीटरचेच रस्ते उभारणे शक्‍य झाले आहे. राज्यात हे प्रमाण केवळ 18 टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात 88 हजार 231 किलोमीटर, तर मराठवाड्यात 31 हजार 368 किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते उभारणे शक्‍य झाल्याचे दिसून येत आहे.

निराशाजनक कामगिरी
मोठे राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, मोठे जिल्हास्तरीय रस्ते आणि अन्य जिल्हा मार्गांच्या उभारणीतही विदर्भाची कामगिरी निराशाजनक राहिल्याचे चित्र आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळत असताना विदर्भातील रस्ते विकासाचे चित्र निराशाजनक असल्याचे मंडळाने नमूद केले. विदर्भात रस्ते विकासाची गती तातडीने वाढवण्याची गरज असल्याचे मतही मंडळाने व्यक्त केले आहे.

रस्ते विकासाचे लक्ष्य (आकडे किमी लांबीचे)
3,27, 069 - राज्य
94, 241 - विदर्भ
1,77,173 - उर्वरित महाराष्ट्र
55, 654 - मराठवाडा

Web Title: vidarbha road issue