आदिवासींच्या वेदनांशी जुळली त्यांची "नाळ'

नागपूर ः गावातील एका समाजमंदिरात बसून रुग्णाच्या तपासणीसह औषध वितरण करताना डॉक्‍टर.
नागपूर ः गावातील एका समाजमंदिरात बसून रुग्णाच्या तपासणीसह औषध वितरण करताना डॉक्‍टर.

नागपूर : जीव वाचविण्यासाठी धावा सुरू असतानाच जेथे सर्व आशा मावळतात तेथे डॉक्‍टरांनाच देवाची उपमा देण्याची परंपरा आहे. माहिती तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाच्या चक्रानुसार जग बदलते आहे. परंतु, अजूनही "डॉक्‍टर...' असे साधे नाव काढले तरी पालावर आयुष्य जगणाऱ्यांच्या मनात धस्स होते. दवाखान्याची पायरी चढण्याचे धाडस त्यांच्यात नाही. निदान, चाचण्या आणि डॉक्‍टरांची "फी', औषधांच्या खर्चाशी त्यांचे काहीच देणेघेणे नाही. अशा चक्रव्यूहातील जंगल दऱ्याखोऱ्यांतील आदिवासींच्या वेदनांवर उपचारांची फुंकर घालणारी एक डॉक्‍टरांची फौज आहे. या साऱ्या डॉक्‍टरांची जंगलातील आदिवासी माणसांच्या वेदनांशी "नाळ' जुळली आहे. आदिवासी डॉक्‍टरांची फौज उभी करणारा तरुण डॉ. आशीष कोरेती.
दरमहा वेतन मोजण्याचे आश्‍वासन देणारी सरकार ग्रामीण भागात "डॉक्‍टर्स पाहिजेत' अशी जाहिरात देते. परंतु, मोल घेत रुग्णसेवा देण्यात तयार नाहीत. शहरातील डॉक्‍टरांच्या "कमाई'चे मीटर 24 तास सुरू असते. चार डॉक्‍टरांचे एक कॉर्पोरेट हॉस्पिटल उभे होते. अशावेळी "विदर्भ ट्रायबल डॉक्‍टर असोसिएशन'च्या विविध पॅथीच्या 100 डॉक्‍टरांनी मागील तीन वर्षांपासून आदिवासी पाडे पालथे घातले. हिंगणा परिसरातील रायपूर, रामटेक असो की, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, कुरखेडा, भामरागडसारख्या दुर्गम भागांसह मेळघाट, किनवटमधील आदिवासी भागात जाऊन माणूसपण दाखवत तेथील आदिवासींसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणारी ही एक नवी चळवळ सुरू केली आहे. आतापर्यंत अडीचशे आदिवासी पाड्यांवर जाऊन या डॉक्‍टरांच्या चमूने आदिवासींच्या बांधवांना उपचार दिले. विशेष असे की, या पाड्यांवर पोहोचणारा प्रत्येक डॉक्‍टर हादेखील "आदिवासी' कुटुंबातील आहे. आदिवासींचे दुःख, वेदनांशी त्यांची नाळ जुळली असल्यानेच त्यांनी ही आरोग्यदायी चळवळ सुरू केली आहे. डॉ. दिलीप कुमरे, डॉ. नरेश उईके यांच्यासह शेकडो डॉक्‍टर सोबतीला येतात. कोणताही मोबदला न घेता जंगलामध्ये, आदिवासी पालावर रुग्णसेवा देत वैद्यकीय व्यवसायाचे व्रत सांभाळणाऱ्या या डॉक्‍टरांना डॉक्‍टर "डे'च्या पर्वावर सलाम करण्यासाठी आपोआपच हात वर जातात.
आदिवासी लोकांच्या सहवासात आमचे बालपण गेले. त्यांच्या वेदना आम्ही अनुभवल्या. त्या वेदना आमच्या काळजावर कोरल्या गेल्या आहेत. आजार अंगावर काढण्याची आदिवासींना सवय असते. यामुळेच त्यांना रुग्णालयात आणण्यापेक्षा त्यांच्या पालावर त्यांच्या गावात जाऊन आदिवासींमधील आजार शोधून उपचार करण्याचा अल्पश: प्रयत्न आहे. डॉक्‍टर आदिवासींच्या दारी हा उपक्रम वैद्यकीय शिक्षण सुरू झाल्यापासूनच मिशन म्हणून सुरू केले आहे.
-डॉ. आशीष कोरेती, विदर्भ ट्रायबल डॉक्‍टर्स असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com