विदर्भवादी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर करणार ठिय्या आंदोलन; वीजबिल कमी करण्याची मागणी 

श्रीकांत पशेट्टीवार 
Friday, 27 November 2020

ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज ग्राहकांचे बिल कमी करणार नाही, असे जाहीर वक्तव्य केले. त्याचाही विदर्भवाद्यांनी निषेध केला. कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे,

चंद्रपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऊर्जामंत्री राऊत यांनी वीज ग्राहकांचे बिल कमी करणार नाही, असे जाहीर वक्तव्य केले. त्याचाही विदर्भवाद्यांनी निषेध केला. कोरोना काळातील वीजबिल सरकारने भरावे, यासाठी विदर्भ राज्य समितीने आंदोलन केले. परंतु या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आता सर्व सामान्यांची वीज तोडण्याच्या अगोदर मुंबई-पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील उद्योगपती, सरकारी बंगले, मंत्रालय याची वीज थकबाकी जाहीर करावी. 

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

त्यांच्याकडून वीजबिल वसूल करावे. त्यानंतरच ऊर्जामंत्री राऊत यांनी विदर्भातील सामान्य माणसांची वीज कापावी. विदर्भ राज्य समिती आता विजेची आरपारची लढाई लढणार आहे, असे चटप यांनी सांगितले.

कोरोना काळातील विदर्भाच्या जनतेचे वीज बिल संपवा. दोनशे युनिटपर्यंत वीज मुक्त करावे. त्यानंतरचे वीज बिल निम्मे करा. कृषी पंपाचे वीज बिल मुक्त करा, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, धान, मोसंबी आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

क्लिक करा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

विदर्भातील केवळ सात कोटी आणि उर्वरित महाराष्ट्राला एक हजार 913 कोटींचे पॅकेज दिले. हा विदर्भावर अन्याय आहे. 35 मि.ली. पावसाचे निकष रद्द करून सरकारने विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस हजार रुपये प्रती हेक्‍टर नुकसान भरपाई द्यावी अन्यथा येत्या चार जानेवारीला ऊर्जामंत्री राऊत यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा चटप यांनी दिला. पत्रकार परिषदेला किशोर पोतनवार, अशोक मुसळे, प्रभाकर दिवे, आनंद अंगलवार आदींची उपस्थिती होती.

संपादन -अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbhawadi leaders will protest in front of Nitin rauts home