भाजपतर्फे लखानी की आंबटकर?

Lakhani-Ambatkar
Lakhani-Ambatkar

नागपूर - आमदार मितेश भांगडिया पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याने भाजपमध्ये अलीकडेच नीती आयोगावर नियुक्ती झालेले अरुण लखानी आणि भाजपचे प्रदेश महासचिव रामदास आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत होणारे ‘लक्ष्मीदर्शन’ लक्षात घेता काँग्रेसचा उमेदवार घोषित झाल्यानंतरच दोघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते. 

चंद्रपूर-गडचिरोली आणि वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर एक उमेदवार निवडून पाठवायचा आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार मितेश भांगडिया यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजप सध्या नव्या उमेदवाराचा शोध घेत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सर्वाधिक अनिश्‍चित असते. बहुमत असतानाही निवडून येणे सोपे नसते. निकालही धक्कादायक लागतात. ‘लक्ष्मीदर्शना’शिवाय ही निवडणूक जिंकताच येत नाही. त्यामुळे भाजपने सावध भूमिका घेतली आहे. 

काँग्रेस कोणाला उमेदवारी देते, यावर नजर रोखली आहे. काँग्रेसने बलाढ्य उमेदवार दिल्यास तोडीस तोड म्हणून अरुण लाखानी यांच्या नावाला पहिली पसंती दिली जाईल, अशी हवा आहे. सहज जिंकणे शक्‍य असल्याचे दिसताच रामदास आंबटकर यांना समोर केले जाऊ शकते. अन्यथा गडकरी यांचे विश्‍वासू समजले जाणारे सुधीर दिवे यांनाही अचानक लॉटरी लागू शकते, अशीही चर्चा भाजपमध्ये आहे. नागपूरमध्ये असाच प्रयोग नितीन गडकरी यांनी केला होता. शेवटच्या क्षणी ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांना उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणले होते. 

चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तीन जिल्ह्यांचा एक मतदारसंघ आहे. यात एकूण १ हजार ६२ मतदार आहेत. भाजपचे संख्याबळ अधिक असले, तरी सुमारे २०० मतदार अपक्ष व इतर छोट्यामोठ्या आघाड्यांचे आहेत. संख्याबळावरून भाजपला निवडणूक जिंकणे अवघड नाही असे दिसत असले, तरी कुठल्याही क्षणी घात होण्याची शक्‍यतासुद्धा नाकारता येत नाही. अपक्षांची संख्या येथे निर्णायक आहे. यामुळे उमेदवार आणि त्याच्यामागे असलेले पक्ष पाठबळ आणि स्थानिक नेत्यांचे पाठबळ यावरच ही निवडणूक जिंकता येणे शक्‍य आहे. 

अद्याप अनिश्‍चितता 
या संदर्भात अरुण लखानी यांना विचारणा केली असता ‘अद्याप मला अधिकृतरीत्या कोणताही निरोप मिळालेला नाही’, असे स्पष्ट केले. या विषयावरची चर्चा माझ्याही कानी आली. पण, अद्याप निश्‍चित काहीही सांगण्यात आलेले नाही, असेही ते म्हणाले.

असे आहे संख्याबळ 
भाजप ४८३
काँग्रेस २४९
राष्ट्रवादी ६३
शिवसेना ४५

अर्ज दाखल करण्याची तारीख - ३ मे
मतदान - २१ मे 
मतमोजणी - २४ मे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com