Vidhan Sabha 2019 : महाआघाडी विरुद्ध महायुतीतच सामना

File photo
File photo

यवतमाळ : जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत तब्बल 87 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. काही मतदारसंघांत बंडखोरांनी आव्हान उभे केल्याने प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. सुरुवातीला काही मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र होते. यात आता वणीचा अपवाद वगळता उर्वरित सहा मतदारसंघांत दुहेरी लढतीचे चित्र आहे. महाआघाडी विरुद्ध महायुतीतच सामना होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा आखाडा आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. त्यासोबत यंदा ही निवडणूक बंडखोरामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. भाजप-शिवसेना यांच्यात युती असली; तरी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसमोर मित्रपक्षांतील बंडखोरांकडून आव्हान उभे आहे. वणी, यवतमाळ तसेच उमरखेड या तीन मतदारसंघांत भाजप उमेदवारांना शिवसेना बंडखोरांचे; तर दिग्रस मतदारसंघात शिवसेनेला भाजप बंडखोरांचे आव्हान आहे. आर्णीमध्ये भाजप उमेदवाराला भाजप बंडखोरांनीच नाकीनऊ आणले आहे. बंडखोरांच्या गर्दीमुळे अनेक मतदारसंघांत तिहेरी लढतीचे चित्र होते. मात्र, जसजशी निवडणूक जवळ आली तस-तसे निवडणूक लढतीचे चित्र बदलत गेले. जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता उर्वरित यवतमाळ, दिग्रस, केळापूर, राळेगाव, उमरखेड तसेच पुसद या सहा मतदारसंघांत थेट लढतीचे चित्र आहे. निवडणूक रिंगणात बंडखोर तसेच इतर पक्षांचे उमेदवार असले; तरी जिल्ह्यात मात्र महायुतीविरुद्ध महाआघाडी अशाच लढतीचे चित्र आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे मदन येरावार विरुद्ध कॉंग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांच्यात लढत होत आहे. शिवसेना बंडखोर संतोष ढवळे, प्रहारचे बिपिन चौधरी यांच्यात होणाऱ्या मतविभाजनात विजयांचे गणित अवलंबून आहे. दिग्रसमध्ये शिवसेना उमेदवार संजय राठोड यांना भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक तसेच भाजपचे नीलय नाईक या दोन चुलतबंधूंमध्ये लढत होणार आहे. उमरखेड विधानसभेत कॉंग्रेसचे विजय खडसे विरुद्ध शिवसेना बंडखोर डॉ. विश्‍वनाथ विणकरे अशा लढतीची शक्‍यता आहे. केळापूर मतदारसंघात कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे यांच्यासमोर भाजप बंडखोर आमदार राजू तोडसाम यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. राळेगाव मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचे प्रा. अशोक उईके आणि कॉंग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांच्यात पारंपरिक लढतीचे चित्र आहे. वणी विधानसभेत जिल्ह्यातील सर्वाधिक 19 उमेदवार रिंगणार आहेत. याठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र आहे. यामुळे आता मतदार कुणाला कौल देतात, याकडे जिल्हावासींचे लक्ष लागले आहे.
29 अपक्ष रिंगणात
जिल्ह्यातील सात मतदारसंघात राष्ट्रीय, प्रादेशिक पक्षांचे 25, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे 33 तर तब्बल 29 उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. यामुळे 29 उमेदवार कुणाचे गणित बसविणार व कुणाचे गणित बिघडविणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com