Vidhan Sabha 2019 : आघाडी ‘बॅकफूट’वर; युतीत जागावाटपाचे त्रांगडे!

राम चौधरी
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कधीकाळी काँग्रेसचा गड असलेला वाशीम जिल्हा १५ वर्षांपासून भाजप-शिवसेनेच्या भगव्या रंगात रंगलाय. रिसोडचा अपवाद वगळता वाशीम आणि कारंजा मतदारसंघ भाजपकडे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यात काँग्रेस आघाडी ‘बॅकफूट’वर आली आहे. युतीतही तीन मतदारसंघांची वाटणी कशी करावी, हा पेच आहे. वंचित आघाडीचेही आव्हान दोन्ही आघाड्यांसमोर आहे.

विधानसभा 2019 : कधीकाळी काँग्रेसचा गड असलेला वाशीम जिल्हा १५ वर्षांपासून भाजप-शिवसेनेच्या भगव्या रंगात रंगलाय. रिसोडचा अपवाद वगळता वाशीम आणि कारंजा मतदारसंघ भाजपकडे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यात काँग्रेस आघाडी ‘बॅकफूट’वर आली आहे. युतीतही तीन मतदारसंघांची वाटणी कशी करावी, हा पेच आहे. वंचित आघाडीचेही आव्हान दोन्ही आघाड्यांसमोर आहे.

वाशीम जिल्ह्यातील चारपैकी मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर बाद झाला आणि रिसोड, वाशीम आणि कारंजा हे तीनच मतदारसंघ राहिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत वाशीम मतदारसंघातून भाजपचे लखन मलिक, तर कारंजातून भाजपचे राजेंद्र पाटणी विजयी झाले होते. रिसोडमध्ये अमित झनक यांनी मोदी लाटेतही मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राखला. आता लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे.

वाशीम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून लखन मलिक यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने मुलाखतीचा फार्स आटोपला असला, तरी त्या पक्षाकडे तगडा उमेदवार नसल्याचे चित्र आहे. कारंजा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे की भाजपकडे, हा तिढा सुटण्याची शक्‍यता धूसर होत आहे. या मतदारसंघातून भाजपकडून आमदार राजेंद्र पाटणी, शिवसेनेकडून माजी आमदार प्रकाश डहाके इच्छुक आहेत.

काँग्रेसजवळ याही मतदारसंघात प्रभावी उमेदवार नाही. बंजारा मताचे प्राबल्य पाहता विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.

रिसोड मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. अमित झनक यांनी २०१४ च्या मोदी लाटेत हा मतदारसंघ कायम राखला होता. येथे काँग्रेसकडून झनक हेच उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. भाजपकडून माजी आमदार विजय जाधव यांच्याऐवजी राजू पाटील राजे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड असला, तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने या मतदारसंघात मारलेली मुसंडी पाहता काँग्रेससाठी वंचितची ‘एंट्री’ जड ठरणारी आहे. झनक यांचे पूर्वीचे निकटवर्तीय प्रा. प्रशांत गोळे वंचित आघाडीकडून रिंगणात उतरणार असल्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या जागावाटपाची घडी बसविणे जिकिरीचे आहे.

कारंजा आणि रिसोडवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. मात्र, कारंजा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडून आघाडीची घडी बसण्याची शक्‍यता आहे. युतीमध्ये मात्र जागावाटप डोकेदुखी ठरणार आहे. कारंजाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी उमेदवारीच्या बोलीवरच राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. आता कारंजात भाजपचे विद्यमान आमदार असल्याने आणि शिवसेनेनेही याच मतदारसंघात दावा ठोकल्याने युतीच्या जागावाटपाचे त्रांगडे कसे सुटणार, या कठीण राजकीय कोड्याचे उत्तर काय निघेल, याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Washin District Aghadi Yuti Seat Distribution Politics