"झुंड' चित्रपटाचा रिअल हिरो क्रीडांगणांसाठी रस्त्यावर!

Vijay barse
Vijay barse

नागपूर : शहरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे व अन्य विकासकामांमुळे कस्तुरचंद पार्कसह विविध खेळांच्या मैदानांची नासधुस होत असल्यामुळे युवा खेळाडूंच्या सरावात व्यत्यय येत आहे. शहरातील क्रीडांगणांचा खेळांसाठीच वापर करण्यात यावा, अशी मागणी क्रीडा विकास संस्थेचे सचिव व "झुंड' चित्रपट ज्यांच्या कार्यावर निर्माण झाला आहे, ते रिअल हिरो प्रा. विजय बारसे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने केली आहे. राज्यातील सर्वच खेळांची मैदाने अतिक्रमणमुक्‍त करण्यात यावी, असे ते म्हणाले.



प्रा. बारसे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर उभारलेल्या धरणे मंडपात मैदाने वाचविण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. ते म्हणाले, मैदानांवर पहिला अधिकार खेळाडूंचा आहे. मात्र सद्यस्थितीत शहरातील अनेक मैदानांवर विकासकामांसाठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे खेळाडूंनी सरावासाठी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कवर मेट्रो स्टेशन उभारण्यात येत असल्यामुळे हे मैदान खेळाडूंच्या सरावासाठी पूर्णपणे बंद झाले आहे. एकेकाळी या मैदानावर मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असे. इथे आंतरराष्ट्रीय सामनेदेखील झाले आहेत. येथे सराव करून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेत. मात्र खोदकामामुळे या मैदानाची वाताहात झाली आहे.

प्रा. बारसे यांनी यशवंत स्टेडियमच्या दुर्दशेकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. या मैदानावर राजकीय नेत्यांच्या रॅली व सभांचे आयोजन होत असल्यामुळे हॅण्डबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉलपटूंच्या सरावात व्यत्यय येत आहे. याशिवाय यशवंत स्टेडियमसमोरील नागपूर महाविद्‌यालयाच्या मैदानाचीही तीच कहाणी असल्याचे ते म्हणाले. प्रदर्शन व धार्मिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्‌ध असलेले रेशीमबाग मैदान, छावणी रोडवरील सी. सी. ग्राऊंड (अंजूमन मैदान), राजभवनाला लागून असलेले मैदान, कामठी रोडवरील इंदोरा मैदान, ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या ललित कला मैदानाचीही कमीअधिक प्रमाणात तीच अवस्था आहे.

महिलांना प्रचंड मनस्ताप
यातील अनेक मैदानांवर अतिक्रमण करण्यात आले असून, आजूबाजूंच्या नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे "डंपयार्ड' बनले आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी अवैध धंदे सुरू असतात. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनात माजी आंतरराष्ट्रीय पंच गुरूमुर्ती पिल्ले, माजी खेळाडू ममता तोमर, वीरेंद्र दहिकर, होमकांत सुरंदसे, खुशाल ढाक, प्रसन्न खरात, लोकेश बनपेला, वेन हिरौंदी, दीपक साने यांनी सहभाग घेतला.

आज देणार मुख्यमंत्र्यांना निवेदन
शहरातील मैदाने वाचविण्यासाठी प्रा. बारसे व त्यांचे सहकारी उद्‌या, मंगळवारी मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांची भेट घेऊन यांना निवेदन देणार आहेत. केवळ नागपुरातीलच नव्हे संपूर्ण राज्यातील क्रीडांगणे अतिक्रमणमुक्‍त करून तिथे "स्पोर्टस कल्चर' विकसित व्हावे, अशी त्यांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com