esakal | क्षयरोग संशोधनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मासळ गावाची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Tuberculosis

क्षयरोग देशातील सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. देशात दररोज पाच हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होत आहे. यामुळे दररोज हजार व्यक्तींचा मृत्यू होतो.

क्षयरोग संशोधनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मासळ गावाची निवड

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : क्षयरोग अभ्यास आणि संशोधनासाठी देशातील ६२५ गावांची निवड झाली आहे. यात महाराष्ट्रातील ५२ गावांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील मासळ गावाची निवड झाली आहे. त्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था, पुणेचे पथक गावात दाखल झाले आहे. 

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद, नॅशनल इन्स्टियुट फॉर रिसर्च इन ट्युबरक्‍युलोसिस चेन्नई, केंद्रीय क्षयरोग विभाग व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात आहे. क्षयरोग देशातील सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. देशात दररोज पाच हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होत आहे. यामुळे दररोज हजार व्यक्तींचा मृत्यू होतो.

देशातील जवळपास चाळीस टक्के व्यक्तींना क्षयरोगाची बाधा झाली, असा आरोग्य विभागाचा अहवाल आहे. यामुळे या रोगावर कायमस्वरूपी उपाययोजना आणि नियंत्रणावर धोरण ठरविण्यासाठी संशोधन केले जात आहे. त्याच अनुषंगाने भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था पुणे यांनी देशातील ६२५ गावांची निवड केली. यात राज्यातील ५२ गावांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्‍यातील मासळचा यात समावेश आहे. 

हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले
 

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था, पुणे या संस्थेचे डॉ. ऋषीकेश आंधळकर यांच्या नेतृत्वात तीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पाच आरोग्य सहायक, चार क्षेत्र परीक्षक, दोन क्ष-किरण तंत्रज्ञ असे पथक मासळ येथे दाखल झाले आहे. सोबत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी प्रयोगशाळा आहे. मासळ या गावाची लोकसंख्या जवळपास अडीच हजार आहे. यातील केवळ आठ नागरिकांची तपासणी होणार आहे. यासाठी पथक आठवडाभर गावात राहील.

नक्की वाचा - कोरोनाकाळात दिवसभर कोमट पाणी पिताय? जरा थांबा. तुमच्या शरीरावर होऊ शकतात परिणाम
 

या उपक्रमाची सुरवात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम, डॉ. मिनल पेटकर, डॉ. चेतन धोंगडे, प्रशांत तुरणकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील, ग्रामसेवक प्रशांत लामगे, वामनराव बांगडे, अब्दुल शेख, प्रदीप गंधारे उपस्थित होते. 

सन २०२५ पर्यंत देशात क्षयरोग निर्मूलनाचा उद्देश आहे. देशातील क्षयरोगाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू आहे. यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी नियोजन आणि धोरणे ठरविण्यासाठी उपयोग होईल. 
- डॉ. प्रकाश साठे
जिल्हा क्षयरोग अधिकारी, चंद्रपूर. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर