Video : नामदेवराव गेले अन्‌ एक झाले सारे गाव 

संदीप रायपुरे 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

एकमेकांच्या साथीने जीवनाची वाटचाल करणारे एक जोडपे विहीरगावमध्ये वास्तव्याला होते. छोटीशी चंद्रमौळी झोपडी अनं वृद्धापकाळात मिळणारी तुटपुंजी मदत, हाच त्यांचा जीवन जगण्याचा आधार. वयाची पंच्याहत्तरी गाठल्याने मनात असून नामदेव असह्य होते. आयुष्याच्या संध्याकाळची अशीच घडतर वाटचाल सुरू होती आणि एक दिवस त्यांचा शेवटचा ठरला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : रुसेवे-फुगवे झाल्याने जवळचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी दुरावल्याचे अनेक उदाहरण आपल्या सभोवती असतात. मात्र एखादी घटना घडली अन्‌ संपूर्ण गाव एक झाल्याची घटना अपवादाने बघायला मिळते. अशी एक घटना गोंडपिपरी जवळच्या विहिरगावात घडली आणि रुसवे-फगवे विसरू संपूर्ण आव एकवटले. हे सगळे का? आणि कशासाठी घडले? वाचा... 

वृद्ध सहचारिणीवर कोळसला दु:खाचा डोंगरच 
एकमेकांच्या साथीने जीवनाची वाटचाल करणारे एक जोडपे विहीरगावमध्ये वास्तव्याला होते. छोटीशी चंद्रमौळी झोपडी अनं वृद्धापकाळात मिळणारी तुटपुंजी मदत, हाच त्यांचा जीवन जगण्याचा आधार. वयाची पंच्याहत्तरी गाठल्याने मनात असून नामदेव असह्य होते. आयुष्याच्या संध्याकाळची अशीच घडतर वाटचाल सुरू होती आणि एक दिवस त्यांचा शेवटचा ठरला. आपला जोडीदार अचानक गेल्याने त्यांच्या वृद्ध सहचारिणीवर तर दु:खाचा डोंगरच कोळसला. आत काय करायचे? अंत्यसंस्कार कोण करणार? आधार कुणीच नाही. दोन्ही मुली गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागात वास्तव्यास आहेत. त्यांच्याशी संपर्क होणेही अशक्‍यप्राय बाब. 

चिनुबाईला गावातील महिलांनी दिला धीर 
नामदेवराव गेल्याची बातमी हळूहळू गावकऱ्यांना समजताच गावातील अनेकजण एकत्र आले. नामदेवरावांच्या परिस्थितीची जाणीव असल्याने गावकऱ्यांनी कोणाचीही वाट न बघता अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. यासाठी कुणालाही बोलावण्याची गरज पडली नाही की, काही मागावे लागले नाही. काहींनी मदत म्हणून पन्नास रुपये दिली तर कुणी शंभर रुपये दिले. पैशाच्या मदतीसोबतच तांदूळ, गव्हाचे पीठ व इतर आवश्‍यक साहित्य देत काही जण नामदेवरावांच्या वृद्ध पत्नीच्या मदतीसाठी सरसावले. आयुष्याच्या उत्तरार्धात एकमेव आधार असलेल्या पतीच्या निधनाने धक्का बसलेल्या चिनुबाईला गावातील महिलांनी धीर दिला. त्यानंतर सर्वांनी नामदेव आलाम यांच्या पार्थिवाला माती देऊन अखेरचा निरोप दिला. 

अबालवृद्धांनी आटोपले सामूहिक अंत्यसंस्कार
नामदेवरावांच्या दोन्ही मुली गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात राहतात. तिकडे मोबाईलचे नेटवर्क नसल्याने वडिलांच्या मृत्यूची बातमी पोहचविण्यासाठी बराच उशीर झाला. पण ते पोहचेपर्यंत गावातील अबालवृद्धांनी आपआपल्या परीने मदत करत सामूहिकरित्या अंत्यसंस्कार आटोपले. अन्‌ त्याचवेळी दोन्ही मुलीही पोहोचल्या. अतिशय गरीब परिस्थितीत आईवडिलांनी काटकसर करित कसे लग्न लावून दिले, याची आठवण यानिमित्त दोघींनाही झाली. त्यानंतर निराधार झालेल्या आईकडे बघताना त्यांना अश्रू अनावर झाले. 

खेड्यांमध्ये संवेदना कायम 
हल्ली खेडेपाडे बकाल होत आहेत. पैसे कमविण्याच्या भानगडीत माणुसकी कोसोदूर गेली आहे. संवेदना बोथट झाल्याचे अनेक उदाहरण आपण पाहिले आहे. अशात गावखेड्यात मात्र आपुलकीचा पाझर कायम असल्याचे या घटनेवरून दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: villegers come together for a cause