कार्यकर्तृत्वाचे सीमोल्लंघन : घरी शिवणकाम करणाऱ्या महिलेने उभारली स्वतःची टेक्स्टाईल फॅक्टरी

सुधीर भारती
Tuesday, 20 October 2020

आपण दुसऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो तर आपला स्वतःचा उद्योग का सुरू करू शकत नाही, असा विचार वारंवार त्यांच्या डोक्यात येत होता. विशेष म्हणजे, लग्नानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात बिछायत केंद्र, ब्युटीपार्लर, बुटीकसुद्धा चालविले. मात्र, त्यात त्यांचे मन रमेना.

अमरावती : बालपणापासूनच काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द... जिद्दीला परिश्रमाची जोड आणि येणारे संकट... अडथळे पार करून यशोशिखरापर्यंत जाऊन पोहोचणे हा अतिशय खडतर प्रवास केवळ काही वर्षांतच पूर्ण करणाऱ्या रंजना अनिल बिडकर या इतर महिलांसाठी आयकॉन ठरल्या आहेत. आज रंजना या यशस्वी उद्योजिका म्हणून परिचित आहेत. विशेष म्हणजे पुरुषप्रधान उद्योगक्षेत्रातसुद्धा एका महिलेने कार्यकर्तृत्वाने सीमोल्लंघनच केले आहे.

वाठोडा शुक्‍लेश्‍वर येथे आईसोबत शिवणकामाचे धडे घेतलेल्या रंजना बिडकर यांनी विवाहानंतरदेखील आपले काम सुरूच ठेवले. घरी पती आणि मुलगी असे संपन्न कुटुंब. मात्र, काही तरी करून दाखविण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. मुलीला नृत्याची आवड असल्याने तिचे ड्रेस घरीच शिवणे सुरू केले. ते आवडल्याने मग शाळेतील अन्य पालकांकडून त्यांना ड्रेसेसच्या ऑर्डर येऊ लागले. हा प्रवास सुरू असतानाच रंजना बिडकर यांच्यातील उद्योजिका घडत गेली.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

सुरुवातीला चार महिलांना सोबत घेऊन त्यांनी ड्रेसेस व नंतर शाळांचे गणवेश तयार करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे सुरुवातीला अतिशय कमी भांडवलात त्यांनी स्वतःचा मार्ग निवडला. मध्यंतरी एका संस्थेत प्रशिक्षक म्हणून नोकरीला लागल्या. मात्र, त्यांच्यातील उद्योजिका स्वस्थ बसू देत नव्हती.

आपण दुसऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो तर आपला स्वतःचा उद्योग का सुरू करू शकत नाही, असा विचार वारंवार त्यांच्या डोक्यात येत होता. विशेष म्हणजे, लग्नानंतर त्यांनी सुरुवातीच्या काळात बिछायत केंद्र, ब्युटीपार्लर, बुटीकसुद्धा चालविले. मात्र, त्यात त्यांचे मन रमेना.

अधिक माहितीसाठी - Video : हृदयाला फुटले पाझर; जेव्हा विधवा म्हणाली, ‘घरचा कर्ता पुरुष गेल्यावर जगायच कसं’

घरची परिस्थिती संपन्न असली तरी पत्नीच्या जिद्दीला त्यांच्या पतीनेसुद्धा साथ दिली. अशातच मोठा उद्योग सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. सुरू असलेल्या व्यवसायातील साठविलेले पैसे गुंतवून नांदगावपेठ एमआडीसीमधील टेक्‍सटाईल झोनमध्ये त्यांनी भूखंड मिळविला आणि त्यांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली.

शाळेच्या गणवेशासोबतच रेडिमेड शर्टस्, गारमेंट्सचे उत्पादनसुद्धा त्यांनी सुरू केले. आज त्यांच्या कारखान्यात १० ते १२ कर्मचारी असून त्यांची उपजीविका चालावी म्हणून कोरोनाच्या काळात औद्योगिक मंदीतही रंजना बिडकर यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

कोरोना काळातही दिला मदतीचा हात

कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, रंजना बिडकर यांच्याकडे नोकरीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर ही वेळ येऊ नये यासाठी त्या सतत धडपडत होत्या. कोरोनाकाळात कापडी मास्क, डॉक्‍टरांना लागणारे ओटी गाउन्स, पीपीई किट तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले आणि अनेकांचा रोजगार वाचविला. ही बाब मनाला खूप समाधान देऊन जाते, असे रंजना बिडकर सांगतात.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violations in the patriarchal industry