
भारतात ही सतर्कता म्हणून लॉकडाउन सुरू असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिगचे अनुपालन अपेक्षित आहे. या सर्व बाबींमुळे कुठलेही ही सार्वजनिक कार्यक्रम घेणे असंवैधानिक आहे.
खामगाव (जि.बुलडाणा) : सोशल मीडियावर बनावट अकाउंटवरून वंचित बहुजन आघाडीच्या नावाने खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून, त्यावर विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये, सध्या देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाला साथ द्यावी. लॉकडाउनचे नियम पाळावेत असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तथा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
अशोक सोनोने यांनी दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, जागतिकस्तरावर ‘कोरोना विषाणूने’ थैमान घातले आहे. भारतात ही सतर्कता म्हणून लॉकडाउन सुरू असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिगचे अनुपालन अपेक्षित आहे. या सर्व बाबींमुळे कुठलेही ही सार्वजनिक कार्यक्रम घेणे असंवैधानिक आहे. वंचित बहुजन आघाडी व भारिप-बहुजन महासंघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अतिशय महत्त्वपूर्ण सूचना आहे की, विरोधकांनी आपल्या पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंट निर्माण करून त्याद्वारे बदनामीकारक संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या फेसबुक व्हॉट्सॲप ग्रुप वरून प्रसारित केल्या जात आहेत. अशा प्रसंगी समस्त कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाची कुठलीही भूमिका, प्रतिक्रिया, कार्यक्रम, आदेश स्वतः अॅड.बाळासाहेब आंबेडकर आपल्या फेसबुक, ट्विटर, पत्रकार परिषद, व्हिडीओद्वारे किंवा पक्षाच्या अधिकृत लेटरहेड वरून प्रसारित करीत असतात.
हेही वाचा - देशी दारूच्या काॅर्टरची किंमत 55 वरून 200 रुपये; येथे सहज होते उपलब्ध
कार्यकर्त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाची कृती करण्यापूर्वी खात्री करून घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील खोट्या बातम्या किंवा खोट्या पोस्टवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शहानिशा करणे बंधनकारक आहे. अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत समस्त महाराष्ट्रातील जनतेने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९वी जयंती आपापल्या घरी राहून शांत व संयमाने साजरी केली. त्याबद्दल त्याचप्रमाणे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाउनचे पालन करावे, असे आवाहनही सोनोने यांनी केले आहे.