आज पडणार मतदानाचा पाऊस!

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांसाठी उद्या, 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले. हवामान खात्याने वादळी पावसाची शक्‍यता व्यक्त केल्याने मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते यांनीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मतदानाचाही पाऊस पडण्याचे संकेत मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण 4412 मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये उद्या सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 146 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार आहे. जिल्ह्यातील 41 लाख 71 हजार 420 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित सकाळी साडेनऊ वाजता डिक दवाखाना येथे मतदान करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी 10 वाजता धरमपेठ येथील महापालिकेच्या शाळेत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी साडेसात वाजता महाल येथील महापालिकेच्या कार्यालयात कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावतील. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सकाळी सात वाजता महाल येथील संघ मुख्यालयाजवळील भाऊजी दफ्तरी शाळेत तर खासदार कृपाल तुमाने सकाळी 9 वाजता सुभेदार ले-आउट येथील इंदिरा गांधी शाळेत मतदान करणार आहेत.

मतदान केंद्रावर जाताना मतदारांनी ओळखपत्र सोबत घेणे आवश्‍यक आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओखळपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बॅंकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज, आधार कार्ड आदी मतदान केंद्रावर दाखवूनच मतदान करता येणार आहे.

मतदान केंद्र आणि खोली क्रमांकाची माहिती देणारे व्होटर स्लिप मतदारांना वाटप करायची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी व्होटर स्लिप वाटपच केले नसल्याचे वास्तव आहे. प्रत्येकाला व्होटर स्लिप वाटप करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी यांना केला होता. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी व्होटर स्लिपचे वाटपच झाले नाही. काही ठिकाणी व्होटर स्लिप मतदानाच्या दिवशी देण्यात येणार असल्याचे उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत मतदान करता येणार आहे. सायंकाळी सहा वाजता केंद्रावर रांगेत असलेल्या सर्व मतदारांना मतदान करता येईल. मतदानापूर्वी उमदेवारांच्या प्रतिनिधींसमोर मॉक पोलिंग होईल. त्यातील मतांची मोजणीनंतर बॅलेट युनिट क्‍लिअर करून 7 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. 12 पैकी 2 मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर उर्वरित 10 मतदारसंघांत एकच बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहे. मतदारांना व्होटर ऍपच्या माध्यमातून मतदान केंद्राचा शोध घेता येईल, याशिवाय 1950 क्रमांकारही फोन करून माहिती घेता येईल.

संविधानाने प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क प्रत्येक मतदाराने बजवावा. नवीन मतदारांनी मतदानाचा अनुभव घ्यावा.
रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com