कंटाळा आला की ती बासरी वाजवते..! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

धामणगावरेल्वे (अमरावती) - येथील माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश भय्या यांची नात वृंदा नंदकुमार राठी हिने जेईई आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षेत भारतात मुलींमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. मूळच्या नाशिकच्या असलेल्या वृंदाला ही गोड बातमी आज गुरुवारी धामणगाव येथे आपल्या आजोळी मुक्‍कामीच मिळाली. मी सलग अभ्यास करीत नव्हती... पण, कंटाळा आला की छान बासरी वाजवून मन प्रफुल्लित ठेवत होती, असे तिने "सकाळ'ला सांगितले. 

चांगली बासरीवादक असलेली वृंदा नाशिक येथील लोकनेते व्यंकट हिरे महाविद्यालयात बारावीला शिकत होती. जेईई आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षेत तिने 321 गुण प्राप्त करून सर्वसामान्य यादीत 71 वा, तर मुलींमधून देशातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तिला या परीक्षेत पदार्थविज्ञान विषयात 105, रसायनशास्त्रात 106 व गणितात 110 गुण मिळालेत. तसेच केंद्र सरकारच्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षेतही तिने देशातून बारावा क्रमांक पटकावला होता. 

भविष्यात वैज्ञानिक बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर येथे प्रवेश घेऊन देशसेवा करण्याचा मानस आहे. मात्र अद्याप निश्‍चित काही ठरवले नाही. पण जे काही करेन ते संशोधन क्षेत्राशी निगडित असेल, असे वृंदाने सांगितले. जेईईसाठी सहा तासच, पण नियमित अभ्यास केला. पण मी देशातून पहिली येईन, अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे ही बातमी माझ्यासाठी धक्का देणारीच होती. ही बातमी ऐकताच मी स्तब्धच झाली. वेबसाइटवर खात्री केल्यानंतरच मी माझा आनंद व्यक्त करू शकली, असेही ती म्हणाली. ती आपल्या यशाचे श्रेय वडील उद्योजक नंदकुमार राठी, आई आर्किटेक्‍ट श्रीमती कृष्णा राठी व सर्व शिक्षकांना देते. 

Web Title: Vrunda rathi