जमीन अधिग्रहण न केल्याने जावई नोकरीच्या प्रतीक्षेत; वेकोलिमुळे विवाहितांना सासुरवास

Wacoli not acquiring land and son in low is waiting for a job Chandrapur news
Wacoli not acquiring land and son in low is waiting for a job Chandrapur news

चंद्रपूर : सभोवतालची शेतजमीन वेकोलिने अधिग्रहित केली. अधिग्रहित जमिनीमध्ये असणारा अकरा एकराचा पट्टा त्यांनी सोडला. लवकरच ही जमीनसुद्धा वेकोलि अधिग्रहित करेल आणि नोकरी मिळेल, अशी शेतमालकांना आशा होती. जावयांना नोकरी लावून देण्याच्या अटीवरच त्यांनी मुलींचे लग्न केले. मात्र, जमीन अधिग्रहित झाली नाही आणि जावयांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे या विवाहितांना सासरचा जाच सुरू झाला. याच त्रासाला कंटाळून आता त्या माहेरी परतल्या आहेत. त्यामुळे आता वेकोलिच्या विरोधात महिलांनी साखळी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

वेकोलिच्या माजरी-कुचना खाणीच्या परिसरात नागलोन हे गाव आहे. कोळसा खाणीचे विस्तारीकरण होत असल्याने अनेकांच्या जमिनी यात गेल्या. त्याचा योग्य मोबदला तसेच त्यांना नोकऱ्यादेखील मिळाल्या. याच गावात ३२ एकर शेती होती. त्यातील सर्वे क्रमांक ६१ मधील ३२ एकरपैकी मध्यभागी असलेली ११ एकर वडिलोपार्जित शेती ही जनार्दन ढवस, देवराव ढवस, नामदेव ढवस आणि विठ्ठल ढवस यांच्या वाट्याला आली.

आपलीही शेती त्यात जाणार आणि नोकऱ्या मिळणार याबाबत सर्व निश्‍चिंत होते. ही नोकरी आपण आपल्या जावयाला देऊ याच आशेवर जनार्दन ढवस यांनी आपली मुलगी राखी हिचे लग्न राजकुमार ठाकरे याच्याशी लावून दिले. त्याचप्रमाणे दुसरा भाऊ देवराव ढवस यांनी आपली मुलगी नीता हिचे लग्न विनोद सोमलकर याच्याशी लावून दिले. तशी बोलणीदेखील त्यांच्यात झाली होती. उरलेल्या दोन भावांनी आपले शेत रुपम धोटे आणि शुभम डोंगे यांना विकले. मात्र, वेकोलि व्यवस्थापनाच्या मनात वेगळेच खलबत शिजत होते.

मध्यभागी असलेल्या या ११ एकर शेतीला सोडून वेकोलिने उर्वरित २१ एकर शेती अधिग्रहित केली. यामुळे सर्वांना धक्काच बसला. मात्र, वेकोलिने हात झटकले. ही शेती तुमची नाही यावर आपला कुठलाही अधिकार नाही असे म्हणत त्यांनी सर्व मागण्या फेटाळून लावल्या. जेव्हा की या क्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी शेतीची पाहणी करून ही जमीन त्यांचीच असल्याचा शेरा दिला आहे.

मात्र, वेकोलिचे मुजोर व्यवस्थापन प्रशासनाला देखील जुमानले नाही. २०१७ पासून हा संघर्ष सुरू आहे. ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल म्हणून लग्न केले. त्यांनी आपल्या पत्नीला जाब विचारायला सुरुवात केली. आपल्या सासऱ्या देखील त्यांनी आपल्या नोकरीच्या कराराचे काय झाले असं विचारायचा तगादा लावला. या मुलींच्या सासरकडून देखील टोमणे मारायला सुरुवात झाली. या जाचापासून कंटाळून या मुलींना आपल्या माहेरी राहण्याची वेळ आली आहे.

शेतीचीही कोंडी

२०१७ पासून हे प्रकरण सुरू आहे. मात्र, वेकोलिने उलट या शेतकऱ्यांवर र सूड उगवायला सुरुवात केली आहे. या शेतीच्या सभोवताली वेकोलीने उपसा केलेले सर्व मातीचे ढिगारे येथे उभारण्यात आले. शेतीकडे जाणारा रस्ता खोदून टाकला, पांदणरस्ता बंद केला. त्यामुळे आजवर जे शेतीतून उत्पादन मिळत होते. ते देखील बंद होण्याची वेळ आली आहे. याविरोधात शेतीधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २५ फेब्रुवारीपासून हे सर्व वेकोलि कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करणार आहेत. जर न्याय नाही मिळाला तर २ मार्चपासून आमरण उपोषण ते करणार आहेत.

शिवसेनेने केला पाठपुरावा

या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम शिवसेनाप्रणित कंत्राटी कर्मचारी सेनेने केले. संघटनेचे पदाधिकारी यांनी वेकोली खाणीचे व्यवस्थापक यांची भेट घेतली. त्यावर तोडगा न निघाल्याने ते नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयात धडकले. मात्र, वेकोलि अधिकाऱ्यांची मुजोरी कायम असल्याने आपण या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे, सचिव अमोल मेश्राम यांचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com