वाडीत डेंगीसदृश आजाराने पुन्हा बळी

वाडीत डेंगीसदृश आजाराने पुन्हा बळी

वाडी - गत महिनाभरापासून डेंगी आजाराच्या प्रसाराने नागरिकात दहशत पसरली. आतापर्यंत मोठ्या संख्येत डेंगीसदृश तापाचे रुग्ण आढळले. त्यात चार रुग्णाचा डेंगीने मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाडी नगर परिषदेसह जिल्ह्याचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. ५ ऑक्‍टोबरपासून परिसरात युद्धस्थरावर जनजागृती व बचाव कार्य सुरू आहे. असे असताना रविवारी पुन्हा एका युवतीचे या आजाराने निधन झाल्याचे उघड होताच पुन्हा एकदा नागरिकांत चिंता निर्माण झाल्याचे दिसून आले. 

मृत युवतीचे नाव शुभांगी विष्णुपंत वाघमारे (वय ३६) असून प्लॉट नं.४० धम्मकीर्तीनगर येथील निवासी आहे. आई माजी खंडविकास अधिकारी मीनाक्षी वाघमारे यांच्यासोबत राहत होती.

एक ऑक्‍टोबरला शुभांगीला ताप आल्याने ती परिसरातील डॉ. शंभरकर यांच्याकडे उपचारासाठी गेली. परंतु, आराम न झाल्याने ती पुन्हा त्यांच्याकडे गेली असता तिची रक्त तपासणी केली. परंतु डेंगीची चाचणी केली नाही.

मृताचे नातेवाईक विशाल झाबरे व भूषण ओरके यांनी दिलेल्या माहितीनुसार ६ दिवसांत तिला आराम झाला नाही. तिची प्रकृती खालावली. ही माहिती मिळताच डॉ. शंभरकर यांनी तिला ६ ऑक्‍टोबरला सायंकाळी ५ वाजता वाडीतील वेल ट्रीट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. गंभीर अवस्थेत तिला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले. संपूर्ण तपासणी केल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी ती अत्यवस्थ असून डेंगीची शक्‍यता घोषित केली. दोन दिवसांच्या अथक उपचारानंतर रविवारी पहिल्या प्रहरी ३ वाजता तिचे निधन झाले. या निधनाची वार्ता  परिसरात समजताच पुन्हा डेंगी आजार चर्चेचा विषय झाला. 

नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
एकूणच सध्याचे नैसर्गिक वातावरण लक्षात घेता नागरिकांनीही पुढे होऊन डेंगी होणाऱ्या  कारणांना आळा घालण्यासाठी जागृत होणे गरजेचे आहे. दोन दिवसांपासून बेमौसमी पावसाने स्थिती अधिक चिंताजनक दिसून येते. या मृत पावलेल्या शुभांगी वाघमारे हिच्या रक्ताचा नमुना नियमा प्रमाणे शासकीय तपासणी केंद्रात पाठवून अहवालानंतर मृत्यूचे कारण निश्‍चित होऊ शकेल अशी माहिती डॉ. सोनाली बन्सोड यांनी दिली. मात्र, जर त्यांच्या म्हणण्यानुसार डेंगी नसेल  तर मग नेमका मृत्यू कशाने झाला? या पूर्वी जे मृत्यू झाले त्यांचाही तपासणी अहवाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे मग वाडीतील शेकडो तापाचे रुग्ण व मृत्यू हा नेमका काय प्रकार? याचा उलगडा होणे गरजेचे आहे. ही यंत्रणा कशासाठी राबविली जात आहे? जि.प ने ९३ डेंगी बाधित रुग्ण कसे जाहीर केले? आदी अनेक प्रश्‍न आता निर्माण होत आहे. एकूणच आता आरोग्य विभागाला नागरिकांच्या ही सहकार्याची गरज आहे.

यंत्रणा कामाला
जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे, व्याहाड पेठ आरोग्य केंद्राच्या डॉ. सोनाली बन्सोड, सोबत जिल्ह्यातील ८० कुशल कर्मचारी, आशा वर्कर्स वाडीत वॉर्डनिहाय धडक मोहीम राबवित आहेत. धूर फवारणी, साचलेले पाणी तपासणी, औषधी टाकणे, गप्पी मासे विहरित टाकणे, स्वतंत्र पाहणी पथक, युद्ध पातळीवर कार्य करीत आहे. हे अधिकारी, कर्मचारी वाडीत तळ ठोकून  आहेत. धडक पाहणीत सुरक्षा नगर १०, हरिओम सोसायटीत १५, आंबेडकरनगर ९, शिवशक्तीनगर १०, धम्मकीर्तीनगर १४, वेणानगर ३१, मंगलधाम सोसायटीत २८ असे एकूण ९३ डेंगीचे रुग्ण आढळून आल्याचे जि. प. आरोग्य विभागाच्या अहवालावरून कळते. अहवालानुसार ४३२ घरांमध्ये डेंगीच्या अळ्या तर ११४ डेंगीचे तापाचे रुग्ण आढळून आले आहे. १९ फॉगिंग मशीनच्या साहाय्याने धुवा फवारणी केली जात आहे. वाडीत एकूण २५ वॉर्ड आहेत. या दृष्टीने ही संख्या असल्याने सोमवारपासून अधिक कुमक पाचारण करून यंत्रणा  अधिक क्रियाशील करणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com