वाडीचे नगराध्यक्ष झाडे यांना लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

नागपूर : नगर परिषदेच्या कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ आत्माराम झाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी अटक केली. या घटनेने वाडीत खळबळ उडाली असून यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तक्रारकर्ते वाडी नगर परिषदेत कंत्राटदार आहेत. त्यांनी वाडी नगर परिषदेत कंत्राटी तत्त्वावर तीन स्थापत्य अभियंत्यांची नियुक्ती केली होती. या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर 2018 ते मार्च 2019 पर्यंतचे चार महिन्यांचे वेतन थकीत होते. कर्मचाऱ्यांचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांनी तक्रारकर्त्यास 24 हजारांची मागणी केली. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. यानुसार विभागाने भंडारा येथील अधिकाऱ्यांना बोलावून सापळा रचला. तडजोडीअंती शुक्रवारी 20 हजार रुपये नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना देण्याचे ठरले. शुक्रवारी सकाळी 10 वाजता नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी तक्रारकर्त्यांकडून त्यांच्या घरी लाचेची रक्कम स्वीकारताच अटक केली. या प्रकरणी आरोपी प्रेमनाथ झाडे यांच्याविरुद्ध वाडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, सचिन हलमारे, अश्‍विनकुमार गोस्वामी, पराग राऊत यांच्यासह चमुने केली.

Web Title: Wadia city president Jhade arrested for taking bribe