वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास मान्यता

Sadguru
Sadguru

यवतमाळ - वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एका विशेष कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ‘रॅली ऑफ रिव्हर्स’ ही ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्‌गुरू यांच्या पुढाकाराने सुरू झालेली संस्था वाघाडी प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य शासनाबरोबर काम करणार असून, यामुळे कोरड्या नद्या पुन्हा प्रवाहित होण्यास मदत होणार आहे. 

राज्य शासनाच्या निधीतून कृषी विभागास पाच वर्षांसाठी ४१५ कोटी रुपये देण्यात येतील. पहिल्या चार वर्षांसाठी प्रतिवर्षी ८३ कोटी ५२ लाख, तर शेवटच्या वर्षांसाठी ८० कोटी १६ लाख रुपयांचा निधी दिला जाईल. प्रकल्पाचे नियोजन, समन्वय, देखरेख करण्यासाठी वाघाडी नदी पुनरुज्जीवन या विशेष कंपनीची स्थापना करण्यात आली. सद्‌गुरू आणि रॅली ऑफ रिव्हर्सच्या तज्ज्ञांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना यासंदर्भातील सादरीकरण ७ ऑगस्ट २०१८ला केले होते. त्याचा प्रकल्प अहवाल नोव्हेंबर २०१८मध्ये सादर झाला. सद्‌गुरूंनी युवकांना देशातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आवाहन केले होते व त्याला प्रतिसाद देऊन तयार झालेली ‘नदी वीरां’ची टीम वाघाडी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेणार आहेत.  

या प्रकल्पासाठी ‘सीएसआर’मधून निधी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. प्रकल्पामध्ये वृक्षलागवड व जलसंधारणाची कामे होणार आहेत. त्यामुळे कोरड्या पडत चाललेल्या वाघाडी नदीचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला अत्यंत वेगाने मंजुरी दिली असून, त्यामुळे मी खूपच आनंदित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा केंद्रबिंदू असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात हा प्रकल्प होत आहे, हे विशेष. या प्रकल्पामुळे नदी व तिच्या परिसरातील जैवविविधतेला फायदा होईलच, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्नही अनेक पटींनी वाढेल व त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल. आम्हाला हा प्रकल्प शाश्‍वत शेतीतून आर्थिक प्रगती व नदी पुनरुज्जीवनाचे मॉडेल म्हणून देश व जगासमोर सादर करायचा आहे. 
- सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com