टाकाऊ अन्नावरच चालतो संसाराचा गाडा

हिंगणा एमआयडीसी - उरलेले टाकाऊ अन्न जमा करताना महिला.
हिंगणा एमआयडीसी - उरलेले टाकाऊ अन्न जमा करताना महिला.

हिंगणा एमआयडीसी - हिंगणा परिसरात फेब्रुवारी महिना येताच सर्वत्र लग्नसराईची एकच लगबग सुरू होते. स्वयंपाक तयार करण्यासाठी ठेकेदार महिलांच्या शोधात असतात. परिसरातील गरीब महिला मोठ्या प्रमाणात स्वयंपाक बनविण्याचे काम करतात. त्यातून त्यांना रोजगारही मिळतो आणि मोठ्या प्रमाणात उरलेले अन्न डब्यात, पिशव्यात घरी घेऊन जातात. त्याच अन्नावर अनेकांचा संसाराचा गाडा चालतो.

या नासलेल्या अन्नावरच घरातील लहानमोठे सदस्य पोट भरतात. दुसरीकडे, हेच सडलेले अन्न जनावरांच्या पोटात जाऊन त्यांना पोटफुगीचा आजार होऊन मृत्यूचा सामना करावा लागतो. अनेक जनावरे आजाराने अकालीच दगावतात.

अनेकांच्या वाट्याला जन्मापासून मरेपर्यंत काबाडकष्ट करूनच जगणे आलेले असते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. ही गरीब-श्रीमंताची दरी पिढ्यान्‌पिढ्‌या कमी होतच नाही. सतत हा रोजगार करणारी सहारेबाई (वय ५५, वानाडोंगरी) आपला अनुभव सांगते, ‘‘स्वयंपाकी ठेकेदाराने महिलांची मागणी केल्यावर मी त्यांना कामावर घेऊन जाते. त्यात वेळेचे बंधन नसते. रात्रीबेरात्री जावे लागते. तीनशे, दोनशे रुपये त्याचा मोबदला मिळतो. उरलेला भाजीपाला व इतरही सामान, कुणी वापस नेले नाही तर ते मिळते. उरलेले अन्न घरी घेऊन जाण्यासाठी मिळते. यावरच कुटुंबाचे पोट भरते. परिसरातील अनेक गरीब महिला माझ्या संपर्कात आहेत. ग्रामीण भागात कुठलाच रोजगार नसल्याने गरीब महिलांना हा व्यवसाय पोट भरण्यासाठी करावा लागतो.’’

हिंगणा तालुक्‍यात मुख्य मार्गावर चौकाचौकांत सभागृह, लॉन मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात नेमाडे सभागृह, बंग सभागृहात, सीआरपीएफ लॉन, येरणे लॉन, बाबडे सभागृह, पालकर सभागृह, रेणुका सभागृह अशा ठिकाणी लग्नसमारंभाने परिसर गजबजून जातो. भीमनगर, इसासनी, पंचशीलनगर, इंदिरामातानगर, राजीवनगर, अमरनगर, निलडोह, वानाडोंगरी, हिंगणा या परिसरातील अनेक गरीब महिला या रोजगारासाठी सहज उपलब्ध होतात.

घरातील सदस्य येणाऱ्या अन्नाची वाट पाहत असतात. दुसरीकडे, शिल्लक टाकाऊ अन्न लग्नसमारंभ आटोपल्यावर योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने कुठेही फेकण्यात येते. सभागृहात लॉन बांधताना ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपंचायत यांनी मालकांना बांधकामाची परवानगी दिली. पण, या टाकाऊ अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com