पर्लकोटा नदीवरच्या पुलाची प्रतीक्षा अखेर संपली; भामरागडवासींना मिळाला दिलासा

लीलाधर कसारे
Wednesday, 6 January 2021

भामरागडला लागून पश्‍चिमेला पर्लकोटा नदी आहे. या नदीवर खूप जुना व ठेंगणा पूल आहे. थोडाही पूर आल्यास हा पूल पाण्याखाली जाऊन रहदारी कित्येक दिवस बंद असते. त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आला की, पुराचे पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरते व बाजारपेठ बंद पडते. आता बांधकाम सुरू झाल्याने भामरागडवासींची समस्या होणार आहे.

भामरागड (जि. गडचिरोली) : भामरागड शहराच्या वेशीवरून वाहणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुरात ठेंगणा पूल बुडत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथील नागरिकांना अनेक दिवस संपर्कहीन व्हावे लागते. या नदीवरील पुलाच्या बांधकामांचे घोंगडे अनेक दिवसांपासून सरकार दरबारी भिजत पडले होते. मात्र सोमवारी (ता. 4) अखेर या पुलाची प्रतीक्षा संपली. पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात झाली आहे.

या कार्यक्रमाला भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे, प्रकल्प व्यवस्थापक अरविंद खांडेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, आदिवासी सेवक सब्बरबेग मोगल, भारती ईष्टाम, शीला येम्पलवार, गजानन सडमेक, सलीम शेख, पंचायत समिती सभापती गोई कोडापे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील विस्वास, सपना रामटेके, पूल बांधकाम अभियंता मिलिंद रंगारी व ओम सेवायवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

भामरागडला लागून पश्‍चिमेला पर्लकोटा नदी आहे. या नदीवर खूप जुना व ठेंगणा पूल आहे. थोडाही पूर आल्यास हा पूल पाण्याखाली जाऊन रहदारी कित्येक दिवस बंद असते. यापलीकडे हाकेच्या अंतरावरून इंद्रावती व पामुलगौतम या नद्या वाहतात. या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगम येथे झाला आहे. पावसाळ्यात तिन्ही नद्या ओसंडून वाहतात. त्यामुळे पर्लकोटा नदीला पूर आला की, पुराचे पाणी भामरागडच्या बाजारपेठेत शिरते व बाजारपेठ बंद पडते.

अहेरी-भामरागड मार्ग कित्येक दिवस बंद राहतो. जनजीवन विस्कळीत होते. जिल्हा मुख्यालयाशी संपर्क राहत नाही. त्यामुळे या नदीवर रुंद व उंच पुलाची गरज लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी व सामाजिक संस्थांनी शासन दरबारी अर्ज-विनंत्या केल्या. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी २१ऑगस्ट २००६ रोजी भामरागडला भेट दिली. त्यावेळी पर्लकोटा नदीवर पुलाची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
 

त्यांनीच गडचिरोलीलगतचा कठाणी नदीवरील पूल व भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीवरील पूल मंजूर करून घेतले. बांधकामाच्या निविदा निघाल्या. कठाणी नदीवरील पूल बांधकाम दोन-अडीच वर्षांत पूर्ण झाले. तेथील रहदारीही सुरू झाली. मात्र, पर्लकोटावरील पूल बांधकामास कंत्राटदारच मिळाले नाही. मध्यंतरी शासन-प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी कंत्राटदार मिळाला. बांधकामाचे ले-आउट टाकण्यात आले.

दोन ते अडीच वर्षांत पुलाचे बांधकाम पूर्ण

पहिल्यांदा केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी ३० ऑगस्ट २०२० रोजी ऑनलाइन भूमिपूजन केले. त्यानंतर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दुसऱ्यांदा प्रत्यक्ष नदीवर येऊन ९ सप्टेंबर २०२० रोजी भूमिपूजन केले. यावेळी बाजारपेठ,

अनेकांची घरे पुलाखाली जाणार असल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला. अशातच वनविभागाची आडकाठी आली. आता मात्र पूल बांधकाम होणार की नाही, अशा संभ्रमात नागरिक असतानाच सोमवारी अचानक पुन्हा ले-आउट टाकून बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे पूल बांधकामांची प्रतीक्षा संपून अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या दोन ते अडीच वर्षांत या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार, अशी आशा भामरागडचे नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - आता आईच्या दुधावाचून जाणार नाही बालकांचा जीव; गरजूंना मिल्क बँकेचा आधार, आतापर्यंत हजारोंना जीवदान

दळणवळण महत्त्वाचे

भामरागड हा अतिशय दुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त तालुका आहे. अशा ठिकाणी विकासाचे वारे वाहायचे असतील, तर दळणवळणाच्या सुविधांवर भर देणे आवश्‍यक आहे. पर्लकोटेवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यास प्रशासनाच्या नावे ही एक मोठी उपलब्धी होईल. नागरिकांचेही अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल. पण, यावरच विसंबून न राहता या तालुक्‍याच्या दुर्गम गावांना आडव्या येणाऱ्या महाकाय नाल्यांवरही पुलांची निर्मिती आवश्‍यक आहे. सरकार पूल बांधत नसल्याने आदिवासी बांधव बांबूचे पूल तयार करून कशीबशी स्वत:ची सोय करून घेतात. पण, कायम स्वरूपी पूल, रस्ते व इतर पायाभूत सुविधांची गरज आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wait for the bridge over the Pearlkota River is finally over