फूटपाथवरून चाला, अस्थिरोग मिळवा

राजेश प्रायकर
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - पादचाऱ्यांना सहजरीत्या चालण्यायोग्य फूटपाथची शहरात वानवा असल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी तुटलेले किंवा घरे व दुकानांपुढील रस्त्यांच्या बाजूने फूटपाथ तयार करण्याचे टाळल्याने पादचाऱ्यांना चालताना चढ-उताराचा सामना करावा लागत आहे. अशा पद्धतीने चालण्यामुळे अस्थिरोगाची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

नागपूर - पादचाऱ्यांना सहजरीत्या चालण्यायोग्य फूटपाथची शहरात वानवा असल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी तुटलेले किंवा घरे व दुकानांपुढील रस्त्यांच्या बाजूने फूटपाथ तयार करण्याचे टाळल्याने पादचाऱ्यांना चालताना चढ-उताराचा सामना करावा लागत आहे. अशा पद्धतीने चालण्यामुळे अस्थिरोगाची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

वृद्ध, शालेय विद्यार्थी, चिमुकले यांना सहज चालता यावे, यासाठी फूटपाथची उंची चार ते  सहा इंच असणे गरजेचे आहे. परंतु, शहरातील फूटपाथ एक ते दीड फूट उंच असल्याने चालण्यास असहज आहेतच. भरीस भर सलग चालता येईल, अशा फूटपाथचीही वानवा आहे. मुळात रस्त्यांच्या बाजूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सलग फूटपाथ असणे आवश्‍यक आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली घरे किंवा दुकानांच्या प्रवेशद्वारापुढे फूटपाथ तोडण्यात आले किंवा दुकानांचे रॅम्प फूटपाथवरून थेट रस्त्यांवर करण्यात आले आहे. काही ठिकाणी महापालिकेनेच घरापुढे किंवा दुकानांपुढे फूटपाथ तयार करण्याचे टाळले आहे. त्यामुळे महापालिका दुकानदारांसाठी फूटपाथ तयार करते की पादचाऱ्यांसाठी, असा प्रश्‍न नागरिक व्यक्त करीत आहेत. घरे किंवा दुकानांपुढे घरमालक किंवा दुकानदारांच्या सोयींनी फूटपाथ तयार करण्यात आल्याचे चित्र आहे. अनेक दुकानदारांनी दुकानांचे रॅम्प थेट फूटपाथवरून रस्त्यांवर उतरविले.  त्यामुळे काही ठिकाणी फूटपाथवरून जाताना पादचाऱ्यांना दुकानांच्या उंच रॅम्पवरून जावे लागत आहे.  कुठे दुकानांच्या रॅम्पचे उंचवटे, तर कुठे घरांसाठी फूटपाथच तयार न केल्याने खोलगट भाग तयार झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना फूटपाथवरून चालताना चढ-उताराचा सामना करावा लागत आहे. असे फूटपाथ नागरिकांच्या आरोग्यास घातक असल्याचे अस्थिरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

कसे होणार शहर स्मार्ट
शहर स्मार्ट करण्याकडे सध्या महापालिकेचा कल आहे. नागरिकांना सहज, सुलभ व आरोग्यदायी सुविधांवर यातून भर देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक फूटपाथ तयार केले जात आहे. फूटपाथ तयार करताना ते  दीड मीटर किंवा त्यापेक्षा रुंद व चार ते सहा इंच उंच असावे, याकडे दुर्लक्ष केले जात असून, सद्यस्थितीत तर फूटपाथ न बोलणेच बरे, असेही राजू वाघ यांनी सांगितले. 

चालताना जर सातत्याने चढ-उतार करावा लागल्यास संबंधिताला कायमचे कंबरेचे दुखणे होऊ शकते. याशिवाय गुडघ्याची समस्या निर्माण होऊन त्यातून पुढे स्पॉन्डिलायटिसपर्यंत हा आजार जाण्याची शक्‍यता आहे. स्पाँडिलायटिस ही वेदनादायी व्याधी असून पाठदुखी, कंबरदुखीने कायम ग्रस्त होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय चढ-उतार करताना लक्ष विचलित झाल्यास पाय मुरगाळल्याने फ्रॅक्‍चर पण होऊ शकते. 
   - डॉ. आलोक उमरे, अस्थिरोगतज्ज्ञ.

Web Title: Walk on footpath, get osteoporosis