सावधान : विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्घ कारवाईचा बडगा 

file photo
file photo

यवतमाळ : जिल्ह्यात गत आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण जेवढे रुग्ण आहेत. त्यापैकी 50 टक्‍के रुग्णांची भर केवळ दहा ते 12 दिवसातील आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर यवतमाळ जिल्ह्याची परिस्थितीसुद्धा आजूबाजूच्या जिल्ह्याप्रमाणे होईल. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण राबवावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. 

पालकमंत्र्यांची प्रशासनासोबत बैठक 
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी अत्यंत तातडीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते. नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, आमदार सर्वश्री डॉ. वजाहत मिर्झा, इंद्रनील नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, नामदेव ससाणे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दारव्हाचे नगराध्यक्ष बबन इरवे, पांढरकवडा नगराध्यक्ष वैशाली नहाते, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी 
पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी करावी. तसेच तालुक्‍यातील अंतर्गत वाहतुकीवरसुद्धा निर्बंध घालावे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉटस्पॉटसाठी संबंधित पालिका क्षेत्रनिहाय नियोजन करावे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सुक्ष्म नियोजन करावे. खासगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाचे ऑपरेशन असेल तर त्याला कोविडची तपासणी करणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या नमुन्याची चाचणी वैद्यकीय महाविद्यालयाने त्वरित करून द्यावी. जेणेकरून संबंधित व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. दुकानांची वेळ कमी करण्याबाबत तसेच बाजारात किंवा दुकानात एकाच वेळी गर्दी होणार नाही, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे. दुकानांसाठी प्रशासनाने ठरवून दिलेली ठराविक वेळ वगळता इतर वेळी अनावश्‍यकपणे बाहेर फिरणाऱ्यांविरुद्घ पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, अशाही सूचना बैठकीत करण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते. 

नागरिकांचा मुक्तसंचार 
काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा कोरोनाच्या रडारवर आले असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे. नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. लॉकडाउनमध्ये शासनाने काही प्रमाणात शिथिलता दिल्यावर नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. नागरिकांचा हा निष्काळजीपणा स्वत:च्या तसेच दुसऱ्यांच्या जिवावर बेतू शकतो. जिल्हा प्रशासन नागरिकांसाठी अहोरात्र झटत असून नागरिकांनी व सर्व लोकप्रतिनिधींनी संकटाच्या यावेळी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे. थोडे कडक धोरण अवलंबिले तर जिल्ह्यात आपण पूर्ववत स्थिती निर्माण करू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले. 

-संपादन: चंद्रशेखर महाजन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com