esakal | काँग्रेसमध्ये वादळापूर्वीची शांतता! पक्षाला पडणार भगदाड?
sakal

बोलून बातमी शोधा

congress

काँग्रेसमध्ये वादळापूर्वीची शांतता! पक्षाला पडणार भगदाड?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशिम : काँग्रेस कमेटीच्या (washim congress) जिल्हाध्यक्ष पदावर रिसोडचे आमदार अमित झनक (risod mla amit zanak) यांची वर्णी लागल्यापासून काँग्रेस अंतर्गत असंतोष धुमसत आहे. जिल्हा काँग्रेस कमेटीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या गठणानंतर पक्षातील असंतोष भडकण्याची शक्यता असून, अनेक दिग्गज पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: एकल प्रभागाचा धोका कोणाला? काँग्रेस खुश, तर भाजप सावध

जिल्ह्यामधे गत बावीस वर्षांपासून जिल्हा काँग्रेस कमेटीची कमान ॲड. दिलीपराव सरनाईक यांच्याकडे होती. सगळ्याच गटातटात समन्वय साधून पक्षाच्या मंचावर सर्वांना एकत्र घेवून येण्यात त्यांची हातोटी होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या इतिहासात तब्बल बावीस वर्ष जिल्हाध्यक्षपदी राहणारे ॲड. दिलीपराव सरनाईक हे एकमेव ठरले आहेत. त्यांच्या जागेवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रिसोडचे युवा आमदार अमित झनक यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक जण इच्छुक होते. यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांचा नंबर लागेल अशी, आशा होती. मात्र, पक्षाने आमदार अमित झनक यांची निवड केल्याने ज्येष्ठ गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. पूर्वी काँग्रेस अंतर्गत दोन गट कार्यरत होते. माजी खासदार अनंतराव देशमुख व झनक गटाचा स्वतंत्र्य सवतासूभा होता. मात्र, दोन वर्षांपासून माजी खासदार अनंतराव देशमुख पक्षाबाहेर असल्याने झनक यांच्या हाती पक्षाचे नेतृत्व आले आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख हे पक्षाबाहेर असले तरी, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज अजूनही काँग्रेस पक्षात कार्यरत आहे. रिसोड- मालेगाव तालुक्याबरोबरच कारंजा, वाशीम, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात अनंतराव देशमुख यांच्या समर्थकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष अमित झनक यांना या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची घडी बसवावी लागणार आहे. नगरपरिषद निवडणुका तोंडावर आल्या असताना पक्षातील असंतोष काँग्रेसला परवडणारा नसून, कार्यकारिणी निवडीत आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

सेना- भाजपचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

काँग्रेसअंतर्गत अनेकांनी पक्षात व्यवस्थित पद मिळाले नाही तर, दुसऱ्या पक्षाचा पर्यायाची चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे. यामध्ये ज्येष्ठांबरोबर युवा नेत्यांचाही समावेश आहे. बहुतेक जण शिवसेना किंवा भाजपचा पर्याय चाचपून पाहत आहेत. या दोनही पक्षाने सध्या सावध पवित्रा घेतला आहे. भेटीगाठीची माहिती गुप्त ठेवली जात असली तरी, याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

loading image
go to top