कृषी समृद्धी महामार्गाचा एप्रिलपासून श्रीगणेशा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

वऱ्हाडातील ७५ टक्के जमिनींचे अधिग्रहण पूर्ण

वाशीम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’ असलेल्या नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती महामार्गाचे काम येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. वऱ्हाडातील वाशीम व बुलडाणा या दोन जिल्ह्यातील महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली असून, ३१ मार्चपर्यंत अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

विदर्भातील कृषी विकासाला चालना मिळावी, तसेच विदर्भातील शेतमालाला मुंबईच्या बाजारपेठेपर्यंत जलदगतीने पोहचता यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर- मुंबई कृषी समृद्धी जलदगती महामार्ग आखला आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये ९७.२३ किलोमीटर, बुलडाण्यामध्ये ८७.२९ किलोमीटर हा महामार्ग जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यांत ८९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीअंतर्गत लॅंड पुलिंग योजनेअंतर्गत वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील ७५ टक्के जमिनीची खरेदी प्रक्रिया पार पडली आहे. वाशीम व बुलडाणा जिल्ह्यातील गावे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पॅकेज दोन अंतर्गत येत असल्याने येथील खरेदी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यात अमरावतीपासून या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. सरकारी पातळीवरून यासाठी वेगाने खरेदी प्रक्रिया उरकण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.

एप्रिलमध्ये काम सुरू करण्याचे नियोजनः द्विवेदी
वाशीम जिल्ह्यामध्ये ७५ टक्के जमिनीचे लॅंड पुलिंगसह खरेदीअंतर्गत अधिग्रहण झाले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून या महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे, अशी प्रतिक्रिया वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

पॅकेज दोनअंतर्गत शेतकऱ्यांचे समाधान
सुरुवातीला वाशीम व बुलडाणा जिल्ह्यामध्ये लॅंड पुलिंगअंतर्गत जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होता. मात्र, मार्च २०१७ च्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमरावती येथील आढावा सभेत तिप्पट मोबदल्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. या प्रस्तावाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. मिळणाऱ्या मोबदल्यावर शेतकरी समाधानी असल्याने या महामार्गाचे काम सुरू होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे चित्र आहे.

Web Title: washim news nagpur mumbai krushi samruddhi highway