जारबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

१८० ब्रॅण्डच्या पाण्याची विक्री
देशात कधीकाळी पाणीही विकले जाऊ शकते याची खात्री असलेल्या पार्ले समूहाने सर्वप्रथम १९९३ मध्ये बिसलरी या बाटलीबंद मिनरल पाण्याची विक्री सुरू केली. जगात आज तीन हजारांपेक्षा जास्त बाटलीबंद पाण्याचे ब्रॅण्ड असून, भारतात ही संख्या १८० पर्यंत आहे. बिसलरी, किनली, ॲक्वाफिना, हिमालय यासारख्या नामांकित ब्रॅण्डला मागणी आहे.

नागपूर - कधीकाळी प्रवासात एखादी पाण्याची बाटली विकत घेणारे नागरिक आता सर्रासपणे घरात पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पाणीविक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. तसेच पाणीटंचाईमुळे फेब्रुवारीपर्यंत २५ रुपयाला मिळणाऱ्या २० लिटर जारची किंमत एप्रिलमध्ये ५० रुपयांपर्यंत गेली आहे. 

शहरात बीआयएसचा परवाना असलेले केवळ तीन व्यवसायिक आहेत. मात्र, गल्लीबोळात पाण्याचा व्यवसाय बोकाळल्याने रोज लाखोंची उलाढाल सुरू आहे. विदर्भात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भीक्ष असले, तरी नागपूर शहरात बाटलीबंद व जारचा व्यवसाय तेजीत आहे. तहान भागविण्यासाठी बंद बाटलीतील थंड पाणी पिण्याकडे अनेकांचा वाढता कल आहे. एक लिटर पाण्याच्या बाटलीचा भाव २० ते ३० रुपयांपर्यंत आहे.

आता बंद बाटलीसह मोठ्या जारमधील शुद्ध पाण्याचा व्यवसायही तेजीत आहे. २० लिटर पाण्याचे जार ४० ते ५० रुपयांना विकले जात आहे. शहरातील छोट्या-मोठ्या कार्यालयापासून अनेक घरांपर्यंतही या जारच्या पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. मागणीनुसार जारविक्रीचे दर ठरत आहे. या व्यवसायासाठी प्रशासनाकडे नियमावलीच नसल्याने जारचे पाणी शुद्ध आहे की नाही, हे तपासायचे कोणी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

आरओचे पाणी महागणार
शहरात ॲक्वाफिना, रॉयल, ॲक्वा, सहारा, बिसलरी आदी कंपन्यांचे पाणी विकले जाते. सोबतच स्थानिक कंपन्यांनीचेही पाणीचे जार घरोघरी पोहोचविले जातात. सध्या जारचे दर ५० रुपयांपर्यंत स्थिर असले तरी ॲक्‍वा व आरो फिल्टर पाण्याचे दर उन्हाळ्यामुळे वाढले आहेत. मे व जूनमध्ये आरओचे पाणी अजून महागणार असल्याचे जारविक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Water Jar Business