जलयुक्त शिवार विधानभवनातही!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नागपूर - ‘जलयुक्त शिवार’ शहरी भागातही राबविले जात असल्याचे माहिती नव्हते. थेट विधानभवनातही जलयुक्त शिवार झाले कसे, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली.

नागपूर - ‘जलयुक्त शिवार’ शहरी भागातही राबविले जात असल्याचे माहिती नव्हते. थेट विधानभवनातही जलयुक्त शिवार झाले कसे, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली.

तब्बल अडीच वर्षांनंतर छगन भुजबळ यांनी रविवारी सायंकाळी नागपुरात पाऊल ठेवले. नागपूर विमानतळावर आगमन होताच कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच यानिमित्ताने केले. समता परिषदेचे महानगर अध्यक्ष श्‍याम चौधरी, राजेश रंगारी यांनी महात्मा फुलेंसारखी  पगडी घालून त्यांचे स्वागत केले. आलारे आला वाघ आला- राष्ट्रवादीचा वाघ आला, भुजबळ साहाब आगे बढो-हम तुम्हारे साथ है, छगन भुजबळ साहेबांचा विजय असो, आदी घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमला. भुजबळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

भुजबळ यांनी शुक्रवारच्या पावसानंतर उपराजधानीत उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. जलशिवार योजना ग्रामीण भागात राबविली जात असल्याचेच आजवर माहिती होते. पण, शुक्रवारच्या पावसाने शहरातही जलशिवाय योजना सुरू असल्याचे दिसून आले.

 शहरात ही योजना राबविली जात असेल तर मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. विधानभवनातही ही योजना राबविल्याचे दिसले त्यासाठी अध्यक्ष, सभापतींची परवानगी घेतली काय, हा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करणार आहे. शेतकरी, कष्टकरी, ओबीसी घटक, दलित, व्यापारी असे सर्वच घटक अडचणीत आहेत. त्यांचेही प्रश्‍न मांडणार असल्याचे भुजबळ म्हणाले.

Web Title: water in Legislative Assembly criticism Chhagan Bhujbal