यवतमाळसाठी दिलासादायक बातमी, मे महिन्याच्या शेवटीही टंचाई नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईशी दोन हात करावे लागते. यंदा कोरोनाच्या संकटात नागरिकांवर तशी वेळ आली नाही. ही निश्‍चित समाधानाची बाब आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटीही जिल्ह्यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा उन्हाळी पीक लागवडीत मोठी घट झाली. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. शिवाय, गेल्यावर्षभर पाऊस येत होता.

यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे उन्हाळी पिकांचे घटलेले क्षेत्र, जलयुक्त शिवार योजनेची झालेली कामे यामुळे यंदा जिल्ह्यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. केवळ चार तालुक्‍यांत अत्यल्प घट असल्याने भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या मॉन्सूनपूर्व निरीक्षणात समोर आले आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईशी दोन हात करावे लागते. यंदा कोरोनाच्या संकटात नागरिकांवर तशी वेळ आली नाही. ही निश्‍चित समाधानाची बाब आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटीही जिल्ह्यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा उन्हाळी पीक लागवडीत मोठी घट झाली. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. शिवाय, गेल्यावर्षभर पाऊस येत होता. पावसाची टक्केवारी 89 टक्‍यांवर पोहोचली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात मुबलक जलसाठा होता.

त्यातच जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. अनेक ठिकाणी आजही पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळेच यंदा जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी अत्यंत समाधानकारक आहे. यांचा फायदा शेतकरी तसेच नागरिकांना होत आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्‍यांपैकी दिग्रस, कळंब, यवतमाळ तसेच झरीजामणी या चार तालुक्‍यात अत्यल्प घट आहे. उर्वरित सर्वच तालुक्‍यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांची स्थिती पाण्याबाबत नाजूक होती. अनेक भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यामुळे जिल्हावासींसाठी सध्यातरी "नो टेन्शन' आहे.

अवश्य वाचा- एकीकडे गर्लफ्रेंड दुसरीकडे पत्नी, वाचा नागपुरातून पळून गेलेल्या कुख्यात कैद्याची लिला

तालुकानिहाय स्थिती

भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आर्णी तालुक्‍याची भूजल पातळी 0.67, बाभूळगाव 0.83, दारव्हा 0.41, दिग्रस 0.25, घाटंजी 0.43, कळंब-0.03, महागाव 0.05, मारेगाव 0.11, नेर 0.98, केळापूर 0.23, पुसद 0.74, राळेगाव 0.69, उमरखेड 0.25, वणी 0.28, यवतमाळ 0.22, झरीजामणी-0.16


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water level of yavatmal district is satisfactory