मे महिन्याच्या शेवटी या गावाला पाणीटंचाईची झळ; पाणी भरताना एक युवती पडली विहिरीत अन्...

शाहीद कुरेशी
Tuesday, 26 May 2020

तालुक्यातील दाभा- नळकुंड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे नळकुंड हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून येथील पाणीपुरवठा योजनेची डीपी जळाली आहे.

मोताळा (जि.बुलडाणा) : मागील पाच-सहा दिवसांपासून विद्युत रोहित्र जळाल्याने नळकुंड गावातील पाणीपुरवठा योजना विस्कळित झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. येथील एकमेव सार्वजनिक विहिरीवर गर्दी होत असून, एक युवती पाणी भरताना विहिरीत पडून जखमी झाली आहे. संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

तालुक्यातील दाभा- नळकुंड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे नळकुंड हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. मागील पाच-सहा दिवसांपासून येथील पाणीपुरवठा योजनेची डीपी जळाली आहे. त्यामुळे नळकुंड गावातील पाणी पुरवठा योजना विस्कळित झाली असून, गावकऱ्यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. गावाला दोन विहिरींवरून पाणीपुरवठा केल्या जाते. परंतु ज्या विहिरीत समाधानकारक पाणी साठा आहे, तेथील डीपी जळाली आहे. 

आवश्यक वाचा - आंगण-रणांगण आंदोलन ट्रोलनंतर भाजपमध्ये धुसफूस; पक्षाचे ध्येय धोरणांवर आक्षेप घेत या पदाधिकाऱ्याने दिला 

तर, दुसऱ्या विहिरीत जेमतेम पाणी असल्याने पाच मिनिटांसाठी नळ सोडल्या जात आहे. गावात एकमेव सार्वजनिक विहीर असून, या विहिरीवर नागरिकांची पाणी भरण्यासाठी तोबा गर्दी उसळते. या विहिरीत रातभरातून तीन-चार फूट पाणीसाठा जमा होते. सकाळी गावकऱ्यांची झुंबड पडताच विहीर तळ गाठते. पुन्हा सायंकाळी विहिरीवर नागरिकांची गर्दी उसळते. गावालगतच्या दुसऱ्या विहिरीत गाळ साचलेला आहे. 

ग्रामपंचायत प्रशासनाने या विहिरीतील गाळ उपसा करण्यास सुरवात केली आहे. सदर विहिरीचे आणखी खोलीकरण करण्यात येणार असल्याचे समजते. सद्यःस्थितीत उन्हाचा पारा चढला असून, नळकुंड येथील गावकऱ्याना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने सदर विद्युत रोहित्र तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. तसेच डीपी दुरुस्त होईपर्यंत गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गोर सेना तालुकाध्यक्ष ईश्वर चव्हाण, गोर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह गावकर्‍यांमधून होत आहे.

विहिरीत पडून युवती जखमी
गावातीलच राणी रोहिदास पसरटे (वय 18) ही युवती रविवारी सायंकाळी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरताना अचानक विहिरीत पडून जखमी झाली. नागरिकांनी तातडीने तिला विहिरीतून बाहेर काढले. तिला रविवारी रोहिणखेड तर सोमवारी बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधित युवतीचा उजवा हात व बरगडीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती ईश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

महावितरणला कळविले
डीपी जळाली असल्याने नळकुंड गावातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. याबाबत महावितरणला कळविले आहे. दुसऱ्या विहिरीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाच-सात मिनिटे पाणीपुरवठा केल्या जात आहे. लवकरच येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- श्री. पंडित, ग्रामसेवक, दाभा-नळकुंड ग्रामपंचायत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water scarcity hit motala taluka at the end of May in buldana district