नागपूरसाठी धोक्‍याची घंटा

राजेश रामपूरकर
बुधवार, 24 एप्रिल 2019

जिल्ह्यातील भविष्यातील गंभीर पाणीटंचाईची समस्या टाळावयाची असेल तर पावसाचे नैसर्गिक पाणी जिरविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. 
- डॉ. वर्षा माने, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

नागपूर - भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा आणि अपुऱ्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. मार्च २०१९ मध्ये घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी एक ते अर्धा मीटरने खालावल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ही घट चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

नागपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या योजना राबविण्यात आल्या. तरीही जलसाठ्यात भर पडलेली नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग बेसाल्ट नामक अग्निजन्य खडक, वालुकामय खडकांनी व्यापलेला आहे.

जिल्ह्यातील भिवापूर, हिंगणा कामठी, सावनेर तालुक्‍यात अर्धा मीटर पाण्याच्या पातळीत घट झालेली आहे. तर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या काटोलसह कुही, नागपूर तालुका, पारशिवनी तालुक्‍यात पाऊण मीटर पाण्याच्या पातळीत घट झालेली आहे. सर्वाधिक पाण्याच्या पातळीत नागपूर तालुक्‍यात ०.८१ तर त्यापाठोपाठ कुही आणि काटोल तालुक्‍याचा क्रमांक लागतो.

नागपूर तालुक्‍यातील पाण्याच्या पातळीत गेल्या पाच वर्षाच्या तुलनेच झालेली घट चिंता  वाढविणारी आहे. मौदा तालुक्‍यात ०.१० म्हणजे सर्वांत कमी भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झालेली आहे. जिल्ह्यात तिन्ही प्रकारचे खडक आहेत. जिल्ह्यात सरासरी ९६८ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या पाच वर्षांत ८६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत १२० मिलिमीटर पाऊस कमी झाला. कळमेश्‍वर, सावनेर, नरखेड, काटोल, हिंगणा, उमरेड, भिवापूर या तालुक्‍यात सरासरी पावसाच्या तुलनेत २०० मिमी पावसाची तूट असल्याचेही अहवालावरून स्पष्ट झालेले आहे. 

Web Title: Water Shortage in nagpur District