esakal | यवतमाळमध्ये पाणीटंचाईच्या झळा, ११ टँकरने पाणीपुरवठा

बोलून बातमी शोधा

water supply by 11 tanker in yavatmal

जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी टंचाई असते. या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. यंदाही जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृतिआराखडा तयार केला आहे.

यवतमाळमध्ये पाणीटंचाईच्या झळा, ११ टँकरने पाणीपुरवठा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात टंचाईने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 11 गावांना 11 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 13 गावात पाणीपुरवठ्यासाठी 13 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे अजून तरी टंचाईने डोके वर काढलेले नाही. मात्र, जसजसा उन्हाळा तापणार तसतसे टंचाईचे चटके बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - 'सरकारने पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये'; नाभिक संघटनेची विनवणी;...

जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी टंचाई असते. या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. यंदाही जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृतिआराखडा तयार केला आहे. टंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे. यंदा पहिला टप्पा निरंक आहे. दुसरा टप्प्यात जानेवारी ते मार्च या दरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सुरुवात झाली आहे. पुसद तालुक्‍यातील नऊ, आर्णी व यवतमाळ तालुक्‍यातील प्रत्येकी एका गावात टँकर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या 16 हजार 438 नागरिकांची तहान भागविली जात आहे. 18 फेऱ्यांनी नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. यंदाच्या आराखड्यात सर्वाधिक खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. 

हेही वाचा - हृदयद्रावक! शेतात काम करताना महिलांना अचानक दिसला तार...

तिसरा व महत्त्वाचा टप्पा एप्रिल ते जून यादरम्यान आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 172 गावांचा समावेश आहे. त्यातील दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात तीन टॅंकर वाढले आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल 453 गावांना टंचाईचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. या गावांसाठी 453 उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, दोन कोटी 27 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यंदा 589 गावांत पाणीटंचाईची शक्‍यता आहे. यासाठी 636 उपाययोजना राबविण्यात येणार असून, सात कोटी 80 लाख 33 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उपाययोजनामध्ये विंधन विहीर कार्यक्रम, तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहीर विशेष दुरुस्ती, खासगी विहीर अधिग्रहण, विहीर खोल करणे, गाळ काढणे, टॅंकर आदींचा समावेश आहे.

सध्या 13 गावांत विहिरींचे अधिग्रहण - 
जिल्ह्यात सात कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात खासगी विहीर अधिग्रहणाची संख्या अधिक आहे. सध्या 13 गावांत पाणीपुरवठ्यासाठी विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. पुसद, उमरखेड, वणी व यवतमाळ तालुक्‍यांत या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून, 17 हजार 419 नागरिकांची तहान त्यावरून भागविण्यात येत आहे.