शहरातील 400 इमारतींची जलपुनर्भरण तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

अकोला: शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी महापालिका ठोस उपाययोजना करणार आहे. त्यासाठी शहरातील एप्रिल २०१७ नंतर बाधण्यात आलेल्या 400 नवीन इमारतीत जलपुनर्भरणाचे काम झाले किंवा नाही याची तपासणी मनपा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे.

अकोला: शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी महापालिका ठोस उपाययोजना करणार आहे. त्यासाठी शहरातील एप्रिल २०१७ नंतर बाधण्यात आलेल्या 400 नवीन इमारतीत जलपुनर्भरणाचे काम झाले किंवा नाही याची तपासणी मनपा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे.

मनपा सभागृहात गुरुवारी (ता.२४) सायंकाळी झालेल्या जलपुनर्भरण कार्यशाळेत आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासंदर्भात माहिती दिली. पूर्वी पासवाचे ६४ दिवस होते. ते आता ३४ दिवसांवर आले आहे. पाऊस विस्कळीत झाला आहे. पाऊस पडण्याची गती वाढली आहे. त्यासोबतच तो जमिनीवर पडल्यानंतर वाहून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. वाहून जाणाऱ्या या पाण्याला जमिनीत अडविण्याचे प्रयत्न होणे आवश्‍यक असल्याचे डॉ. टाले यांनी सांगितले. 

या कार्यशाळेला जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील सर्व शाळांचे व्यवस्थापक, मुख्याद्यापक, होटेल व्यावसायिक, मंगल कार्यालय, लॉन आर्किटेक्ट असोसिएशन, क्रेडाई असोसिएशन तसेच सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

लक्ष द्यावे असे काही!
० पाण्याचा वापर काटकसरीने करा
० कमी खर्चातही जलपुनर्भरण शक्य
० प्रदूषित पाणी जिरणार नाही, याची काळजी घ्या
० दैनंदिन पाणी वापराच्या पद्धतीत बदल करावा लागेल
० हातपंप किंवा कुपनलिकांमध्ये थेट पानी सोडू नये

15 टक्केच पाणी मुरवा
पावसाच्या पडणाऱ्या पाण्यापैकी एक लाख घनमीटर चौरस क्षेत्रावरील ४० हजार घनमीटर पाणी समुद्रात वाहून जाते. तेच प्रमाण नागरी भागात पडणाऱ्या पावसाचे आहे. त्यातील १५ टक्केच वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविल्यास भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

या ठिकाणी होऊ शकते जलपुनर्भरण
० पडिक जमीन
० शोष चरातून
० शौष खड्डे
० नादुरुस्त हातपंप
० पुनर्भरण करता येऊ शकतील अशा कुपनलिका
० विहिरीद्वारे

पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूर्गभातील पाण्याची पातळी वाढविणे हाच इमारतीच्या तपासणी मागील उद्देश आहे. कुणावरही कारवाई करणे हा उद्देश नाही. जलपुनर्भरणासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा

Web Title: Water transfusion inspection of 400 buildings in the city