पाण्यासाठी विहिरी, बोअरवेलकडे धाव

Borewell
Borewell

नागपूर - उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत होणाऱ्या वाढीमुळे महापालिकेने आता  शहरातील जुन्या विहिरी, बोअरवेलकडे धाव घेतली आहे. विहिरींची स्वच्छता, बोअरवेलची दुरुस्ती तसेच नव्या बोअरवेल खोदकामासाठी पालिकेने धावाधाव सुरू केली. नळ नसलेल्या भागात बोअरवेल खोदकामासाठी चार एजन्सीची नियुक्ती केली असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही कामे करण्याचे लक्ष्य दिले आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणारे नवैगाव खैरी तसेच तोतलाडोह येथील धरणे कोरडी पडली आहेत. कन्हान नदीही आटली असून मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी मिळण्याची खात्री नाही. शहरात आतापासून कुलर सुरू झाले असून पाण्याची मागणी साडेसातशे एमएलडीपर्यंत जाणार आहे. वाढीव गरज भागविण्यासाठी पालिकेने आता बाहेरील वापराच्या पाण्यासाठी विहिरी तसेच बोअरवेलकडे मोर्चा वळविला आहे. 

शहरात ७८४ सार्वजिनक विहिरी असून मागील वर्षी ५४८ विहिरींचे नमुने तपासण्यात आले. यात ९९ टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. मात्र, या विहिरींच्या पाण्याचा वापर शौचालय, भांडी, कपडे धुणे, झाडांसाठी करता येणार आहे. त्यामुळे किमान बाहेरील वापरासाठी या विहिरींच्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही पालिकेच्या जलप्रदाय विभागाने केले आहे. आतापर्यंत ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली असून त्यावर पंप लावून वस्त्यांमध्ये पाणी पुरविण्यात येत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. याशिवाय विहिरींचे जीपीएसद्वारे सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले. जलवाहिन्याचे जाळे नसलेल्या भागात प्राधान्याने विहिरींची कामे करण्यात येत आहे. 

संभाव्य पाणीटंचाईचा भागावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यानंतर इतर भागातील विहिरींचीही स्वच्छता करण्यात येत आहे. नळ नसलेल्या भागात ३४७ बोअरवेलचे खोदकामही सुरू करण्यात आले आहे. चार एजन्सीवर बोअरवेलची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत ९६ बोअरवेल खोदून पूर्ण झाल्या आहेत. एप्रिलपर्यंत बोअरवेल खोदकामाचे लक्ष्य एजन्सीला देण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 

५२५४ बोअरवेल दुरुस्तीची कामे 
सध्या अस्तित्वात असलेल्या ५२५४ बोअरवेलची दुरुस्ती करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दुरुस्तीची कामेही चार एजन्सीला देण्यात आली आहे. बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याबाबत तपासणी करण्यात येत असल्याचे जलप्रदाय विभागाने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com