जलवाहिनी फुटली, जलसंकटात भर

संत्रा मार्केट : जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर वाहणारे पिण्याचे पाणी.
संत्रा मार्केट : जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर वाहणारे पिण्याचे पाणी.

नागपूर : शहरावर जलसंकट तीव्र असताना गुरुवारी महामेट्रोच्या कामादरम्यान संत्रा मार्केट प्रवेशद्वाराजळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे गांधीबाग झोनमधील नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली. शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरळीत होईल.
संत्रा मार्केट परिसरात आयटीडीसी कंपनीतर्फे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू असताना आयटीडीसी कंपनीने बेजबाबदारपणाचा कळस गाठत 375 एमएम व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली. त्यामुळे संत्रा मार्केट रस्त्यावर काही वेळातच पाणी जमा झाले. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत काम पूर्ण होईल, असे ओसीडब्ल्यूने कळविले आहे. त्यामुळे गुरुवारी बजेरिया, मारवाडी चाळ, भालदारपुरा, नातिक चौक, रुईकर मार्ग, राम मंदिर गल्ली, जुने हिस्लॉप कॉलेज परिसर, अत्तर गल्ली येथील नागरिकांना पाणी मिळणे बंद झाले.
एक लाख नागरिकांचे पाणी व्यर्थ
मेट्रो प्रकल्पाचे कामे करणाऱ्या वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांनी नोव्हेंबर 2016 पासून आतापर्यंत 13 ठिकाणी जलवाहिनी फोडली. त्यामुळे 49.45 दशलक्ष लिटर पाणी वाहून गेले. वाहून गेलेले पिण्याच्या पाण्याने एका झोनमधील एका दिवसाला एक लाख नागरिकांची तहान भागविणे शक्‍य होते. कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com