आम्ही भानावरच आहोत अध्यक्ष महोदय! 

आम्ही भानावरच आहोत अध्यक्ष महोदय! 

देवानंद पवार यांचे श्रीपाद जोशींना प्रत्युत्तर 

यवतमाळ - आमची नाळ शेतकऱ्यांशी जुळलेली असल्यामुळे वास्तवाचे भान आम्हाला कायम असते. साहित्याचा मूळ हेतू विसरून बेभान झालेल्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अध्यक्ष तुम्हीच बेभान झालात, असे प्रत्युत्तर शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना दिले आहे. 

नागपूर येथे पत्रकार परिषदेतून दुष्काळग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळपट्टी होत असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. त्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी याप्रकरणी खुलासा केला होता. या खुलाशाला पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

अवाढव्य खर्चाला अत्यावश्‍यक खर्च ठरवताना साहित्य महामंडळ अध्यक्षांनी नेमके कोणते निकष लावले? शक्‍य तितक्‍या कमी खर्चातही उत्कृष्ट संमेलन होऊ शकते. आम्हाला ते सांगण्याचा नैतिक अधिकार आहे का? पहिले राज्यस्तरीय फुले, आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन (मार्च 2016) घाटंजी तालुक्‍यातील माणूसधरी येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात 50 साहित्यिक व दहा ते पंधरा हजारांपेक्षा जास्त शेतकरी-शेतमजूर कार्यक्रमाला उपस्थित होते. अत्यंत कमी खर्चात हे संमेलन झाले होते. या संमेलनात साहित्यिकांनी मानधन अथवा प्रवासखर्च घेतला नाही किंवा त्यांच्या पाहुणचार व स्वागतावर कोणताही खर्च झाला नाही. इच्छा व प्रामाणिक हेतू असेल तर कार्यक्रमाचा खर्च नक्कीच कमी करता येतो. केवळ खर्च कमी करण्याच्या सूचना देऊन जबाबदारी झटकून ते करता येणार नाही, असा टोलाही देवानंद पवार यांनी लगावला. 

साहित्य संमेलनाचा एकही पैसा साहित्य महामंडळाच्या खात्यात नसतो. महामंडळाशी त्याचा काडीचाही संबंध येत नाही असा दावा श्रीपाद जोशी करतात. मात्र, साहित्य महामंडळाने हा निधी मिळण्यापूर्वीच तब्बल सहा लाख रुपये आयोजकांकडून संमेलन निधीच्या नावाखाली महामंडळाच्या खात्यात जमा करून घेतले. जर आर्थिक बाबतीत महामंडळाचा काडीचाही संबंध येत नाही तर सहा लाख खात्यात जमा करून घेण्याचे काय कारण? असा प्रश्नही देवानंद पवार यांनी विचारला आहे. साहित्य संमेलनातील उधळपट्टीचे अप्रत्यक्ष समर्थन करताना श्रीपाद जोशी यांनी देशात होत असलेल्या कोट्यवधींच्या लग्न समारंभांकडे कटाक्ष टाकला. मात्र मोठे लग्न समारंभ हे त्या व्यक्तींच्या व्यक्तिगत मिळकतीमधून होत असतात. संमेलन हे शासकीय मदत व लोकवर्गणीतून होते. त्यामुळे येथे हा उपदेश लागू होणार नाही, असे पवार म्हणाले. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने अत्यंत जबाबदारीने कोणाबद्दलही आकस न ठेवता शेतकरी हितासाठीच या मुद्द्याला हात घातला असून त्याला अविवेकी म्हणणे दुर्दैवी आहे. सर्व साहित्यिकांनी संमेलनातील उधळपट्टीवर विचार करून एक आदर्श पुढे ठेवावा, असे आवाहनही देवानंद पवार यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com