प्राचार्य म्हणतात, आमच्याकडे पदव्युत्तर विभाग नाही

संजय देशमुख
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या दहांपैकी सात प्राचार्यांनी आमच्या महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या सर्वेत स्पष्ट केले. त्यामुळे अभ्यासमंडळावर नियुक्‍त करण्यात आलेले ते दहा सदस्य विद्यापीठ कायद्यान्वये अपात्र असल्याच्या तक्रारीत नुटाने केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे दिसून येते.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या दहांपैकी सात प्राचार्यांनी आमच्या महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीने केलेल्या सर्वेत स्पष्ट केले. त्यामुळे अभ्यासमंडळावर नियुक्‍त करण्यात आलेले ते दहा सदस्य विद्यापीठ कायद्यान्वये अपात्र असल्याच्या तक्रारीत नुटाने केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे दिसून येते.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर कुलगुरूंनी काही सदस्यांची नियुक्‍ती करताना कायद्याला बाजूला सारल्याचा नुटाचा आरोप आहे. यासंदर्भात नुटाने कुलपतीकडे तक्रार दाखल केली. या दाव्यात तथ्य असल्याचे प्राचार्यांनी दिलेल्या माहितीवरून निदर्शनास येते. यासंदर्भात कुलगुरू डॉ. चांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी केल्याचे सांगून त्या नियुक्‍त्या बरोबर असल्याचे सांगितले होते. विद्यापीठ कायद्यान्वये अभ्यासमंडळावर एखाद्या शिक्षकाची सदस्य म्हणून नियुक्‍ती करायची असल्यास विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात संबंधित विषयाचा पदव्युत्तर विभाग असावा व तो शिक्षक पदव्युत्तर विभागाला शिकविणारा असला पाहिजे. यानुसार, या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यापैकी केवळ तीन प्राचार्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर उर्वरित सात प्राचार्यांनी संबंधित पदव्युत्तर विभाग नसल्याचे स्पष्ट सांगितले.
यामध्ये जी. एस. गावंडे महाविद्यालय उमरेडचे प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले, तीन पदव्युत्तर विभागाला आता जुलै महिन्यात परवानगी मिळाली आहे. त्यांना मॅथेमॅटिक्‍स पदव्युत्तर विभाग आपल्याला या नवीन परवानगीत मिळाला का? असे विचारले असता त्यांनी होय सांगितले. मात्र, फेब्रुवारी महिन्यात परवानगी नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. अभ्यासमंडळावरील नियुक्‍त्या या जून महिन्यापूर्वी करण्यात आल्या असून नुटाने या महाविद्यालयात गणित पदव्युत्तर विभाग नसल्यामुळे येथील सदस्यांची नियुक्‍ती अपात्र ठरत असल्याची तक्रार कुलगुरूंकडे 1 जून रोजीच केली होती. भारतीय महाविद्यालयात बॉटनी पदव्युत्तर विभाग नसल्याचे येथील प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांनी स्पष्ट केले. जी. बी. मुरारका कला वाणिज्य महाविद्यालय, शेगावचे प्राचार्य डॉ. राठोड यांनी कोणताही पदव्युत्तर विभाग नसल्याचे सांगितले.
डॉ. सिन्हा महाविद्यालय पातूरचे प्राचार्य डॉ. जायले यांनीही महाविद्यालयात बिझनेस मॅनेजमेंटचा पदव्युत्तर विभाग नसल्याचे सांगितले. आर. ए. आर्ट एमके कॉमर्स ऍण्ड एस. आर. राठी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संचेती यांनी इतिहास संबंधित पदव्युतर विभाग नसल्याचे सांगितले. नारायणराव राणा महाविद्यालय बडनेऱ्याचे प्राचार्य डॉ. वैराळे पदव्युत्तर विभाग नाही, तर कामरगाव येथील आर्टस व सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. जाने यांनीही आमच्या महाविद्यालयात भूगोल पदव्युत्तर विभाग नसल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we don't have post graduate deaprtment, says principal