Video दोन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेल्या एका लग्नाची अनोखी गोष्ट... वाचाच

संदीप रायपुरे
Thursday, 21 May 2020

दोन्ही कुटुंबीयांनी 19 मे रोजी वधू गीतांजलीच्या घरी लिखितवाडा घोट येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला. वधूकडील मंडळीनी लग्नाची परवानगीदेखील घेतली होती. पण, गडचिरोली जिल्ह्यात जाण्याकरिता वराकडील मंडळींना परवानगी मिळाली नाही.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : 29 मार्च रोजी त्यांचे लग्न होणार होते. पत्रिका छापून आल्या. सारी तयारीही झाली. पण, कोरोना आला अन्‌ सरकारने टाळेबंदी लावली. स्थिती सामान्य होईल. त्यानंतर लग्न करू, असे ठरले. मात्र, टाळेबंदीचा चौथा टप्पा लागू झाला. त्यामुळे आहे, त्या परिस्थितीत विवाहबंधनात अडकण्याचे ठरविले. काल मंगळवारी (ता. 19) लग्न झाले. वधूच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून लग्नासाठी परवानगी मिळाली. वराला मिळाली नाही. मग काय वर-वधू आपापल्या पाच नातेवाइकांना घेऊन आंतरजिल्हा सीमेवर पोहचले आणि वैनगंगा नदीच्या पुलावरच लग्नगाठ बांधली.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यातील गणपूर येथील रसिकांत नेवारे वनविभागात रोजंदारीवर काम करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. घरी तो आणि त्यांचे वडील. वडील शेती करतात तर रसिकांत वनविभागाच्या कामावर. घर सांभाळणार कुणी नाही. त्यामुळे यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्‍यातील घोट लिखितवाडा येथील गीतांजली राऊत हिच्याशी त्याचा विवाह ठरले.

29 मार्च रोजी होणाऱ्या या लग्नाची तयारी पूर्ण झाली. पत्रिकाही वाटून झाल्या. पण, या शुभकार्यात कोरोनाचे विघ्न आले. आज-उद्या कोरोनाचे वादळ शांत होईल यानंतर लग्न करू असा त्यांचा विचार झाला. दुसरीकडे टाळेबंदीचे टप्पे वाढतच गेले. शेवटी दोन्ही कुटुंबीयांनी 19 मे रोजी वधू गीतांजलीच्या घरी लिखितवाडा घोट येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला. वधूकडील मंडळीनी लग्नाची परवानगीदेखील घेतली होती. पण, गडचिरोली जिल्ह्यात जाण्याकरिता वराकडील मंडळींना परवानगी मिळाली नाही.

गावाकडे जायला निघाले होते आजोबा, वाटेत घडले असे काही की...

परंतु यावर मार्गही निघाला. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर लग्न करण्याबाबत दोन्ही कुटुंबीयांचे एकमत झाले. वर आणि त्याचे पाच नातेवाईक गणपूरवरून वैनगंगा नदीपुलावर पोहचले. हा नदीपूल जिल्हासीमेवर आहे. गावात लग्नाची तर परवानगी घेतली होती. परंतु जिल्ह्याची सीमा गाठण्यासाठी होणारा अळथळा लक्षात घेता गीतांजलीने तीही परवानगी जिल्हा प्रशासनाकडून मिळविली. त्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकासह गडचिरोली जिल्ह्यातून सीमेवर पोहचली.

वैनगंगा नदीपुलालगत शिवमंदिर आहे. याच ठिकाणी हे दोघेही सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे विवाहाबंधनात अडकले. मोबाईलवर मंगलाष्टके वाजविण्यात आली आणि उपस्थितांनी अक्षतांचा वर्षाव केला. सकाळी अकरा वाजता वधूच्या घरी होणारा हा विवाह सायंकाळी साडेसहा वाजता गडचिरोली-चंद्रपूर आंतरजिल्हा सीमेवर पार पडला. विवाहासाठी मोजकीच मंडळी असल्याने सामाजिक अंतरही राखण्यात आले. विवाहानंतर रसिकांत गीतांजलीला घेऊन गणपूरला पोहचला. वधूचे नातेवाईक घोट लिखितवाड्याला रवाना झाले.

परिस्थितीवर मात करीत पुढे निघायचे
कोरोनाने समाजात झालेले बदल भीतीदायक आहेत. मात्र, परिस्थितीवर मात करीत पुढे निघायचे हा संदेश आम्ही या विवाहाद्वारे दिला आहे.
- रसिकांत नेवारे, नवरदेव, गणपूर  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wedding was built on the bridge of Waingange river