हे काय ? कोळशाची मालगाडी चढली ट्रकवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

अपघातातील मिनी ट्रक हा कोराडी येथून लोखंडी साहित्य घेऊन 500 मेगावॅट विजकेंद्रात येत होता. विजकेंद्रातील कोळसा हाताळणी विभागाच्या वॅगन टिपलरजवळ मालगाडीतील कोळशाचा डब्बा खाली केल्यानंतर रुळावर लावण्यात आला होता.

खापरखेडा (जि.नागपूर) : येथील 500 मेगावॅट विजनिर्मिती केंद्रात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास कोळशाच्या मालगाडीच्या खाली डब्याने ट्रकला धडक दिली. या धडकेने ट्रक उलटला व मालगाडीचा खाली डबा त्यावर चढला. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. श्रीकांत उर्फ शिकू महादेव पांडे (वय 61, वार्ड नं. 3 खापरखेडा) असे ट्रकचालकाचे नाव आहे.

 

अधिक वाचा- अरेरे !  चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

काचा फोडून बाहेर निघाला जखमी चालक
अपघातातील मिनी ट्रक हा कोराडी येथून लोखंडी साहित्य घेऊन 500 मेगावॅट विजकेंद्रात येत होता. विजकेंद्रातील कोळसा हाताळणी विभागाच्या वॅगन टिपलरजवळ मालगाडीतील कोळशाचा डब्बा खाली केल्यानंतर रुळावर लावण्यात आला होता. या दरम्यान आणखी उरलेले काही कोळशाचे डब्बे खाली केल्यानंतर उभ्या असलेल्या डब्याला धक्का देण्यात आला. अचानक रेल्वेरूळ ओलांडत असताना ट्रकला डब्याची जोरदार बसली. काही अंतरावर जाउन ट्रक उलटला. त्यावर कोळशाच्या मालगाडीचा खाली डबा चढल्यामुळे ट्रकचा चेंदामेंदा झाला. घटनेचे गांभीर्य पाहून ट्रकचालकाने ट्रकच्या काचा फोडून तो कसबसा बाहेर निघाला. सुदैवाने ट्रकचालक थोडक्‍यात बचावला. त्याच्या पायाला जबर मार लागल्याने तो जखमी झाला. अपघात पाहून त्याचा ट्रकचालकाचा रक्‍तदाब वाढला होता. यावेळी सुरक्षाविभाग व संबंधित कोळसा हाताळणी विभागाच्या अधिका-यांना घटनेची माहिती देण्यात आली. लागलीच महाजेनकोची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमीला महाजनकोच्या दवाखान्यात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिका-यांनी एक्‍स-रे काढण्यासाठी नागपूर मेडिकल रुग्णालयात जखमी ट्रकचालका "रेफर' केले. परंतु जखमीच्या विनंतीवरून खापरखेडा येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खापरखेडा परिसरात बातमी पसरताच विजकेंद्रातील कामगारांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
 
अधिक वाचा-  अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

महाजनकोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दररोज या विभागातून रेल्वे रूळ ओलांडून अनेक कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कामगार ये-जा करीत असतात. शिवाय दररोज रेल्वेने कोळसा वाहतूक करणारी मालगाडी दळणवळण करते. मात्र कोळशाची मालगाडी येत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षारक्षकांनी वाहतूक व पायदळ जाणा-यांना थांबविणे गरजेचे आहे. परंतू असे कधीच दिसून येत नाही. त्यामुळे येथील सुरक्षा "रामभरोसे' असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

अधिक वाचा- मुलीची ममता : आईचा मृतदेह बघताच मुलीनेही घेतला जगाचा निरोप

घटनेची पुनरावृत्ती  
अशीच घटना 7 एप्रिल 2010 रोजी याच 500 मेगावॅट विजनिर्मिती केंद्रात नारोबा बारोबा गेटजवळ घडली होती. त्या घटनेत मात्र ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. परंतु याच विजकेंद्रात आज घडलेल्या अपघातात ट्रकचालक थोडक्‍यात बचावला. त्यामुळे घटनेची पुनरावृत्ती होऊन सुदैवाने प्राणहाणी मात्र टळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is this Coal cart mounted on truck