काय? खड्ड्यांची तक्रार नोंदविण्यासाठी सोय

file photo
file photo

नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. 
शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीरतेने दखल घेत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तांवरून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मागील पाच महिन्यांत 22 दुर्घटना घडल्या. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू व 29 नागरिक जखमी झाले आहेत. मात्र, याकडे महापालिका व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे कारण देत ही जनहित याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. 
या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपाययोजना करण्याच्या हेतूने आणि रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी शपथपत्र दाखल केले. या शपथपत्रानुसार, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच संबंधित विभागाकडे ती तक्रार पाठविण्यात येईल. तसेच या तक्रारीची दखल घेण्यासाठी त्या संबंधित विभागाला तीन दिवसांचा अवधी देण्यात येईल. मात्र, मुदतीनंतरही त्या संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास भादंवि 217 व 283 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयीन मित्र म्हणून ऍड. राहिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले. तर सरकारतर्फे ऍड. सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली. 
अशी दाखल करा तक्रार 
शहर वाहतूक विभागाने वाहतुकीच्या तक्रारींसाठी विविध सोशल मीडिया साइट्‌स उपलब्ध करून दिल्या आहेत. याच सोशल मीडिया साइट्‌स खड्ड्यांमुळे त्रस्त नागपूरकरांच्या सोयीकरिता वाहतूक विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार ई-मेल आयडी ः dcptrafficnagpur@gmail.com, ट्विटर अकाउंट क्रमांक ः @trafficngp, व्हॉट्‌सऍप क्रमांक ः 9011387100 देण्यात आला असून नागरिकांना खड्ड्यांसंदर्भात यावर तक्रार करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com