काय झाले की, वर्ध्यात करावा लागला तीन दिवसांचा लॉकडाउन 

रूपेश खैरी 
शुक्रवार, 10 जुलै 2020

अहवालात नवरदेवाची आई, नवरी आणि या लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी इतवारा परिसरातील दोन वऱ्हाडी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाला आता धडकी भरली आहे. 

वर्धा : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून यावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना म्हणून वर्ध्यात शुक्रवार (ता. 10) पासून सोमवारी (ता. 13) पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात केवळ वैद्यकीय सेवा आणि औषधी दुकाने तेवढी सुरू राहणार आहेत. 

हे वाचा—सत्ताधारी पडले तुकाराम मुंढेंवर भारी; दिला 'स्मार्ट' धक्‍का
 

लग्नाने उडविली प्रशासनाची झोप 
पिपरी (मेघे) येथील झालेल्या लग्नाने प्रशासनाची झोप उडविली आहे. या लग्नातील नवरदेवच कोरोनाबाधित असल्याचो पुढे आल्याने अख्ख वऱ्हाड पॉझिटिव्ह येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज आलेल्या अहवालात नवरदेवाची आई, नवरी आणि या लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी इतवारा परिसरातील दोन वऱ्हाडी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाला आता धडकी भरली आहे. 
या लग्नात असलेल्या वऱ्हाड्‌यांचा शोध घेत हाती आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधित नवरदेवाची नवरी आणि त्याची आई कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. या दोघींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असताना दुपारी या लग्नात गेलेल्या दोघांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. हे दोघे इतवारा बाजार परिसरातील रहिवासी असून हा भाग दाटीवाटीचा असल्याने या परिसरात त्यांचा आणखी कोणाशी संपर्क आला याचा शोध घेण्यात येत आहे. 

हे वाचा— ताई थांब जाऊ नको... स्वराजची शेवटची आर्त हाक

आतापर्यंत 30 जणांचे घेतले स्राव 
या लग्न समारंभात उपस्थित असलेल्यांपैकी एकूण 30 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे येत्या दिवसात आणखी किती जणांचा स्वॅब पॉझिटिव्ह येईल हे सांगणे सध्या कठीण आहे. यामुळे वर्धेकरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसराचाही समावेश 
आज जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये आसपासच्या ग्रामपंचायतीमध्येही लॉकडाउन राहणार आहे. यात पिपरी (मेघे), साटोडा, नालवाडी, सावंगी (मेघे), उमरी (मेघे), बोरगाव, म्हसाळा, नटाळा आणि सिंदी (मेघे) आदी गावांचाही समावेश करण्यात आला आहे. या गावात या संचारबंदीचा प्रभाव राहणार आहे. या काळात या भागात नागरिकांनी घरीच रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

यवतमाळ येथील व्यक्ती कोरोनाबाधित 
सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता आलेला यवतमाळ येथील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. 

-संपादन : चंद्रशेखर महाजन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened was a three-day lockdown in Wardha